नागपुरातील शांतिनगर पोलीसांकडून व्यापाऱ्याला ८० हजाराची मागणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 09:23 PM2020-04-22T21:23:01+5:302020-04-22T21:23:46+5:30
युवतीसोबत आपत्तीजनक व्यवहार करून धमकाविल्याचे प्रकरण शांत होण्यापूर्वीच शांतिनगर पोलीस पुन्हा एका वादात फसली आहे. एका व्यापाऱ्याला धमकावून ८० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप व्यापाऱ्याने थेट गृहमंत्र्याकडे केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : युवतीसोबत आपत्तीजनक व्यवहार करून धमकाविल्याचे प्रकरण शांत होण्यापूर्वीच शांतिनगर पोलीस पुन्हा एका वादात फसली आहे. एका व्यापाऱ्याला धमकावून ८० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप व्यापाऱ्याने थेट गृहमंत्र्याकडे केला आहे. युवतीच्या प्रकरणाशी संबंधित पीएसआय व त्याच्या साथीदारावरच व्यापाऱ्यानेही आरोप लावला आहे.
१७ एप्रिल रोजी एका युवतीने पीएसआयवर आपत्तीजनक व्यवहार करून धमकावल्या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. बुधवारी याच पीएसआय सोबत ९ पोलीस कर्मचारीव एका दलाला विरुद्ध परिसरातील व्यापाऱ्याने ८० हजाराची मागणी केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ६० वर्षीय तैय्यबभाई चाम्पावाला यांची हार्डवेअरची दुकान आहे. १८ एप्रिलच्या सकाळी तैय्यब कर्मचाऱ्यांसोबत ग्रीन नेट लावत होते. त्यावेळी पोलीसांचे पथक तिथे पोहचले. पोलीसांनी तैय्यब व त्याच्या कर्मचाऱ्याला धमकावत, लॉकडाऊनमध्ये दुकान उघडल्याचा आरोप लावून मारहाण करू लागले. तैय्यबने शटर बंद असल्याचे सांगितल्यानंतरही पोलीस कर्मचाऱ्यांनी तैय्यब व त्यांच्या अजय नावाच्या कर्मचाऱ्याला गाडी बसविले. पोलीस त्यांना ठाण्यात न नेता डीबी कक्षात घेऊन गेले. तिथे लॉकडाऊनचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल न करण्याच्या बदल्यात ५ लाख रुपयांची मागणी केली. परिसरातील एक केबल संचालक तिथे पोहचला. त्याने तैय्यबला पैसे देण्याचा सल्ला दिला. दरम्यान तैय्यबचे नातेवाईक तिथे पोहचले. त्यांच्याकडून ८० हजार रुपये घेतल्यानंतर तैय्यबला सोडण्यात आले.
पोलीसांच्या या कृत्यामुळे तैय्यब दहशतीत आले. त्याच दरम्यान त्यांना युवतीने केलेल्या तक्रारीची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी गृहमंत्र्याच्या कार्यालयाला तसेच वरिष्ठ अधिकारी व शांतिनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात शांतिनगर पोलीसांकडून पैशाची मागणी केल्याचा संशय व्यक्त होत आहे. शांतिनगर परिसरातील एक केबल संचालक पोलीसांसाठी दलालीचे काम करतो. तो पोलीसांच्या माध्यमातून अवैध धंदेवाल्यांकडून वसूली करण्याबरोबरच मध्यस्थ म्हणून भूमिका बजावतो. गेल्या काही महिन्यापासून एक पीएसआय शांतिनगर पोलीस ठाणे संचालित करीत आहे. त्याच्याप्रती नागरिकांमध्ये रोष आहे.