शांतीनगर पोलिसांनी आधीही दाखल केला होता अदखलपात्र गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:08 AM2021-02-10T04:08:59+5:302021-02-10T04:08:59+5:30
नागपूर : कुख्यात गुन्हेगार विजय वागधरे याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकांच्या तक्रारीवरून शांतिनगर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. ...
नागपूर : कुख्यात गुन्हेगार विजय वागधरे याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकांच्या तक्रारीवरून शांतिनगर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या या ढिलाईनंतर सुनील हारोडे आपल्या साथीदारांच्या मदतीने विजयला अद्दल घडविण्याच्या कामी लागला होता. सुनील आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या चौकशीत ही माहिती पुढे आली आहे. हे लक्षात घेता शांतीनगर पोलीस ठाण्यातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. या दरम्यान शांतीनगर पोलिसांनी विजयच्या हत्या प्रकरणी अटक केलेल्या सुनील हरोडे, सागर करारे, बंटी ऊर्फ यश हरोडे तसेच सुमित ढेरे यांची १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे.
रविवारी रात्री २४ वर्षीय विजय ऊर्फ विजू वामन वागधरे याची शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायणपेठ येथे हत्या झाली होती. पोलिसांच्या ढिलाईमुळेच ही घटना घडल्याचा नागरिकांचा आरोप आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीतही हीच माहिती पुढे आल्याने ते पोलिसांच्या कामगिरीवर नाराज आहेत. विजय कुख्यात गुन्हेगार होता. त्याने सायंकाळी ५ वाजता सुनील हरोडेचा चुलत भाऊ संजय हरोडे आणि उदय घुबड़े यांच्यावर हल्ला केला होता. यात ते दोघेही जखमी झाले होते. तक्रार नोंदविण्यासाठी शांतीनगर पोलिसात गेले असता फक्त अदखलपात्र गुन्हा नोंदविला होता. या घटनेच्या तीन तासांनंतर विजयचा खून झाला. आपली चूक लक्षात आल्यावर शांतीनगर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला. मात्र त्यापूर्वीच विजयला पकडून ताब्यात घेतले असते तर ही खुनाची घटना टळली असती.
शांतिनगर पोलीस स्टेशनच्या परिसरात कुख्यात तिरुपती भोगे सह अनेक गुन्हेगारांचे मोठाले बॅनर लागलेले आहेत. यावरूनच या परिसरात गुन्हेगार किती सक्रिय आहेत, हे लक्षात येते. तिरुपतीच्या विरोधात मकोकाची कारवाई करण्यात आली आहे. शांतीनगर ठाण्याच्या परिसरात अनेक गुन्हेगार सध्या नेता बनून फिरत आहेत. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर मंगळवारी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या परिसरात लागलेले होर्डिंग हटविले. पोलीस तिरुपतीचा शोध घेत आहेत.
...
पोलिसांच्या मदतीनेच आरोपीची सुटका
विजय वागधरेच्या खुनानंतर शांतिनगर पोलिसांची पुन्हा एक अफलातून कामगिरी पुढे आली आहे. फैजान मन्सूरी या कुख्यात गुन्हेगाराने कळमनामध्ये करण वर्मा नामक युवकाची हत्या केली होती. फैजानला नोव्हेंबर महिन्यात पोलिसांनी शस्त्रांसह पकडले होते. एका महिन्यापेक्षा अधिक काळ तो कारागृहात होता. मात्र शांतिनगर डीबी पथकातील काही कर्मचाऱ्यांनी फैजानच्या वडिलांना मुलाची जमानत करण्याचा मार्ग सांगितला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीनेच त्याची जमानतीवर सुटकाही झाली. यानंतर काही दिवसातच त्याने खुनाची घटना घडविली. या घटनाक्रमात बारकाईने तपास झाल्यास अनेक आश्चर्यकारक बाबी पुढे येऊ शकतात.
...