शेतकऱ्यांमध्ये शरद जोशींनी स्वाभिमान जागृत केला
By admin | Published: December 27, 2015 03:24 AM2015-12-27T03:24:35+5:302015-12-27T03:24:35+5:30
शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी शेतकरी आंदोलनाला नवी दिशा दिली. त्यांनी रास्ता रोको, रेल रोको आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लढा दिला.
मान्यवरांचे मत : तिरपुडे महाविद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली
नागपूर : शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी शेतकरी आंदोलनाला नवी दिशा दिली. त्यांनी रास्ता रोको, रेल रोको आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लढा दिला. त्यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांमध्ये स्वाभिमान जागृत करण्याचे काम केले, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
सिव्हिल लाईन्स येथील तिरपुडे महाविद्यालयाच्या ठवरे सभागृहात शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्षस्थानी राजकुमार तिरपुडे होते. व्यासपीठावर निवृत्त पोलीस महासंचालक पी. के. बी. चक्रवर्ती, अर्थशास्त्राचे अभ्यासक डॉ. श्रीनिवास खांदेवाले, दिलीप नरवडिया, धनंजय धार्मिक, इंद्रजित आमगावकर, अरुण केदार उपस्थित होते. शेतकरी संघटनेचे राम नेवले म्हणाले, शरद जोशींनी कांदा, ऊस, कापसाला भाव मिळावा यासाठी अनेकदा आंदोलने केली. अनेक मेळावे घेऊन त्यांनी देशाच्या विकासाचे मूळ शेतमालाच्या भावात आहे हे सरकारला पटवून दिले. शेतकऱ्यांना कर्जात मरू देणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली होती.
परंतु त्यांच्या अकस्मात निधनामुळे त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. डॉ. श्रीनिवास खांदेवाले म्हणाले, शरद जोशींनी शेतकऱ्यांना सन्मानाने जीवन जगण्याचा मंत्र देऊन त्यांच्यात आत्मविश्वास जागृत केला. आत्मविश्वासावर शेतकरी संघटना उभी करून तरुण शेतकऱ्यांना संघटित केले. माजी पोलीस महासंचालक पी. के. बी. चक्रवर्ती म्हणाले, देशाला नवा विचार देऊन शरद जोशींनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे यांनी शरद जोशींसोबत केलेल्या आंदोलनांना उजाळा देऊन शेतकऱ्यांचा चांगला नेता देशाने गमावल्याची खंत व्यक्त केली. संचालन अरुण केदार यांनी केले. कार्यक्रमाला बाबा कोंबाडे, वामनराव कोंबाडे, तिरपुडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केशव पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)