शरद काळमेघ यांचा यूडीसीटी-आयसीटीच्या अल्युमना असोसिएशन पुरस्काराने गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 05:09 PM2022-01-24T17:09:58+5:302022-01-24T17:10:41+5:30
Nagpur News यूनिर्व्हसीटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल इंजिनिरींगच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठीत माजी विद्यार्थी पुरस्काराने (एक्स्ट्रा म्यूरल) स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अध्यक्ष शरद काळमेघ यांनी गौरवान्वित करण्यात आले.
नागपूर : यूडीसीटी-आय.सी.टी पूर्वीच्या यूनिर्व्हसीटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल इंजिनिरींगच्या (यूडीसीटी) वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठीत माजी विद्यार्थी पुरस्काराने (एक्स्ट्रा म्यूरल) स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अध्यक्ष शरद काळमेघ यांनी नुकतेच गौरवान्वित करण्यात आले.
मुंबई येथे आयोजित या कार्यक्रमाला पद्मविभूषण डॉ. एम.एम.शर्मा, पद्मश्री डॉ. जी.डी.यादव, कुलगुरू प्रा. डॉ. पंडीत, यूडीसीटी ॲल्युमना असोसिएशनचे डॉ. संजय मेहंदळे, माहरूफ रुस्तमवाला, श्रीरंग जोशी, डॉ. शशांक मस्के उपस्थित होते. देशभरातील यूडीसीटी-आयसीटीचे माजी विद्यार्थी, शिक्षक या कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी झाले होते.
आयसीटी ही तंत्र शिक्षणासाठी नावाजलेली जगप्रसिद्ध संस्था आहे. आयसीटीतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर काळमेघ यांनी दंतचिकित्सा जागतिक स्तरावर नेण्याच्या दृष्टिकोनातून २००६ मध्ये स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय व रुग्णालयाची वानाडोंगरी, (जि. नागपूर) स्थापना केली. येथे आता आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संशोधन केले जात आहे. संशोधनातील त्यांच्या या कार्याबद्दल पद्मविभूषण शर्मा यांनी कौतुक केले. हा पुरस्कार प्राप्त करणारे ते विदर्भातील पहिले व्यक्ती आहेत.
यापूर्वी पद्मविभूषण एम.एम. शर्मा, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मश्री जी.डी. यादव, पद्मविभूषण होमी सेठना आदी मान्यवरांना हा पुरस्कार मिळाला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश लेले यांनी केले, तर आभार तिपण्णा मरिअप्पा यांनी मानले. यूडीसीटी-आयसीटीच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कल्याणाकरिता दोन लक्ष रुपयांची देणगी याप्रसंगी काळमेघ यांनी जाहीर केली.