नेतृत्वात विकासदृष्टी हवी... शरद पवारांचा 'या' भाजप नेत्याला टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 04:13 PM2021-11-17T16:13:06+5:302021-11-17T19:07:31+5:30
पाच वर्षात विदर्भातील नेतृत्व असूनदेखील उद्योग क्षेत्राच्या समस्या दूर होऊ शकल्या नाही. त्या समस्या तेव्हाच सोडविल्या जाऊ शकत होत्या. मात्र, नेतृत्वात विकासदृष्टी हवी. अशा शब्दात पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता टोला लगावला.
नागपूर : अनेकदा नेते जेथून येतात त्या भागाचा जास्त विकास होतो. पाच वर्षात विदर्भातील नेतृत्व असूनदेखील उद्योग क्षेत्राच्या समस्या दूर होऊ शकल्या नाही. त्या समस्या तेव्हाच सोडविल्या जाऊ शकत होत्या. मात्र, नेतृत्वात विकासदृष्टी हवी, अशा शब्दात पवारांनी नाव न घेता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
शरद पवार यांचे बुधवारी दुपारी चार्टर्ड विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यानंतर एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यप्रणालीची प्रशंसा केली.
प्रादेशिक असमतोलामुळे काही भागातील विकासाला चालना मिळू शकली नाही. प्रत्येक भागाचा विकास करणे ही राज्य चालविणाऱ्यांची जबाबदारी असते. केंद्र सरकारमध्ये काही पक्ष, प्रांत यांचा विचार न करता पूर्ण देशाच्या विकासाचा विचार करतात. संसदेत कुणाचीही समस्या दूर करण्याची इच्छा दाखविणारे कमी मंत्री आहेत, त्यात नितीन गडकरी यांचे नाव अग्रक्रमाने येते, अशा शब्दात त्यांनी गडकरींचे कौतुक केले.
त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटणं अयोग्य
त्रिपुरात काही घडले त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटणे ही अयोग्य बाब आहे. ज्याप्रमाणे कायदा हातात घेण्यात आला, व हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी काही राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले ते चुकीचेच होते. त्रिपुरात काही झाले यात दुकानदार, व्यापाऱ्यांची काय चूक ? त्यांना किंमत मोजायला लागली. अशा निष्पाप दुकानदार, व्यापाऱ्यांचे नुकसान काही प्रमाणात का होईना, पण भरून देण्यासाठी सरकारने मदत धोरण तयार करावे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.