शरद पवार, उद्धव ठाकरेंना नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा अधिकारच नाही- देवेंद्र फडणवीस
By योगेश पांडे | Published: May 12, 2023 04:12 PM2023-05-12T16:12:44+5:302023-05-12T16:12:52+5:30
उद्धव ठाकरे यांना निकाल त्यांच्या बाजूने आला असे वाटत असेल तर त्यांनी खुशाल ढोल बडवावे, या शब्दांत फडणवीस यांनी टीका केली.
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर शिंदे सरकार बचावले आणि राज्यात विविध राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. पवार व ठाकरे यांना नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा अधिकारच नाही. जर उद्धव ठाकरे यांना निकाल त्यांच्या बाजूने आला असे वाटत असेल तर त्यांनी खुशाल ढोल बडवावे, या शब्दांत फडणवीस यांनी टीका केली.
नागपुरात ते शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो वापरत लोकसभा व विधानसभा निवडणूक लढविली. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी विचार आणि इतके वर्ष जुनी युतीदेखील सोडली. आता ते कोणत्या नाकाने नैतिकतेच्या गोष्टी करत आहेत, असा सवाल फडणवीस यांनी केला. शरद पवार आणि नैतिकतेचा संबंध काय आहे असे विचारत पवारांनी भाजपला नैतिकता शिकविली तर कठीणच होईल. आम्हालादेखील इतिहासात जावे लागेल. वसंतरावांचे सरकार कसे गेले हे राज्याने पाहिले होते. पवार ज्येष्ठ नेते आहेत. ज्येष्ठ नेते बोलत असतात, त्याकडे लक्ष द्यायचे नसते, असे फडणवीस म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने आता विधानसभा अध्यक्षांना सर्वाधिकार दिले आहेत. अध्यक्षांवर दबाव आणण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर हे ‘फ्री ॲंड फेअर’ प्रक्रियेत हे बसत नाहीत. विधानसभा अध्यक्ष हे कुणाच्याही दबावाला बळी पडतील, असे मला वाटत नाही. ते स्वत: निष्णात वकील आहेत. जे कायद्यात व संविधानात आहे त्यानुसारचे ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, असे फडणवीस म्हणाले.