नागपूर मनपाकडे शरद पवारांचे लक्ष; घेणार पदाधिकाऱ्यांकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 07:36 PM2022-07-14T19:36:42+5:302022-07-14T19:37:35+5:30
Nagpur News राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांचे एका कार्यक्रमासाठी शुक्रवारी सकाळी नागपुरात आगमन होत आहे.
नागपूर : नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेश पदाधिकारी गेल्या महिन्यापासून सक्रिय झाले असताना, आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार हे देखील स्वत: लक्ष देणार आहेत. पवार यांचे एका कार्यक्रमासाठी शुक्रवारी सकाळी नागपुरात आगमन होत आहे. यादरम्यान ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांकडून पक्षाच्या स्थितीचा आढावा घेणार असून महापालिका निवडणुकीसाठी आवश्यक सूचना देणार आहेत.
शरद पवार यांचे सकाळी १०.३० वाजता नागपूर विमानतळावर आगमन होईल. कृषी विकास प्रतिष्ठानतर्फे सायंकाळी ५ वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. सी. डी. मायी कृषीतज्ज्ञ पुरस्कार डॉ. सुधीर भोंगळे यांना शरद पवार यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील पवार यांच्यासोबत एकाच मंचावर असतील. या कार्यक्रमापूर्वी दुपारी १२ ते ४ या वेळात पवार हे विदर्भातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतील. नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी सुरेश भट सभागृहात पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्याचे नियोजन केले होते. मात्र, पवार हे शनिवारी सकाळीच मुंबईसाठी रवाना होणार आहेत. त्यामुळे शुक्रवारी दुपारी शहरातील पदाधिकाऱ्यांना वेळ देऊन नागपूर महापालिकेच्या निवडणुकीबाबत चर्चा करणार आहेत.
शहर कार्यकारिणीची बैठक
- नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी दुपारी ३ वाजता रविभवन येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला नागपूर संपर्क प्रमुख, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित राहणार आहेत.