शरद पवारांच्या मुलाखतीमधील विदर्भाबाबतचा भाषिक वर्चस्वाचा मुद्दा खोडसाळपणाचा; श्रीहरी अणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 11:10 AM2018-02-22T11:10:40+5:302018-02-22T11:12:32+5:30
वेगळ्या विदर्भाचे अग्रणी नेते श्रीहरी अणे यांनी राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या विदर्भाबाबतच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: विदर्भाबाबत हिंदी- मराठी भाषिकांच्या वर्चस्वाचा वाद हा खोडसाळ व पद्धतशीर गैरप्रसार करणारा आहे. विदर्भात हिंदी व मराठी लोकच नव्हे तर बंगाली, छत्तीसगढी, तेलंगी, गोंडी व मारवाडी भाषिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. आम्ही ह्याला आमची समृद्धी समजतो, न्यूनता नव्हे, अशा शब्दात वेगळ्या विदर्भाचे अग्रणी नेते श्रीहरी अणे यांनी राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या विदर्भाबाबतच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे.
आपल्या प्रतिक्रियेत त्यांनी पुढे, विदर्भाचे राज्य झाल्यास त्याचा मुख्यमंत्री हिंदी भाषिक असेल की मराठी भाषिक, ही भीती फक्त विदर्भाचे राजकारण करणाऱ्या राजकारण्यांना वाटत असेल. तशी भिती त्यांची कमकुवत व स्वार्थी मानिसकता दर्शविते.
विदर्भ राज्याची मागणी ही भाषावादावर आधारित नाही. आमच्या मागणीचा थेट संबंध विकासाशी आहे. १९६० ते २०१४ पर्यंत महाराष्ट्राचा एकाही ‘‘मराठी भाषिक’’ मुख्य मंत्री विदर्भाचा विकास करु शकला नाही, म्हणून आम्हाला विदर्भाचे राज्य हवे आहे.
काय होते पवारांचे विदर्भाबाबतचे वक्तव्य?
जागतिक मराठी अकादमी आणि बीव्हीजी ग्रुप आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या कार्यक्र मात महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी शरद पवारांची प्रकट मुलाखत घेतली होती. यावेळी बोलताना शरद पवारांनी वेगळ्या विदर्भासाठी लोकमत घ्यावे असे मत व्यक्त केले होते. याच मुद्यावर बोलताना पुढे वसंतराव नाईक यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत विदर्भातून इतके मुख्यमंत्री झाले तरी स्वतंत्र विदर्भाची मागणी कशी होते? या राज यांच्या प्रश्नावर पवार म्हणाले, वेगळा विदर्भ मागणारा मूलत: मराठी माणूस नाही, अन्य भाषिक आहे. वेगळ्या राज्याचे नेतृत्व आपल्याकडे येऊ शकते, असे मानणारे अन्य भाषिक वेगळ्या विदर्भाची मागणी करत आहेत. सामान्य माणूस मनापासून त्याचा पुरस्कर्ता नाही. ज्या कोणाला वेगळा विदर्भ हवा असेल त्यांनी लोकमताच्या माध्यमातून तो घ्यावा.