शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नागपुरात तीन मतदारसंघावर दावा
By कमलेश वानखेडे | Published: July 11, 2024 06:27 PM2024-07-11T18:27:15+5:302024-07-11T18:27:56+5:30
Nagpur : पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांचा दावा
नागपूर :नागपूर जिल्हयातील काटोल व हिंगणा हे दोन विधानसभा मतदार संघ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपारीक मतदार संघ आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आघाडीच्या राजकारणात हे दोन्ही मतदार संघ आम्ही लढवत आहोत. यासह उमरेड, कामठी किंवा रामटेक यातील कुठलाही एक अशा तीन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष निवडणूक लढवेल, असा निर्णय घेण्यात आला असून तसा प्रस्ताव पक्ष श्रेष्ठीकडे सादर करण्यात आल्याचा दावा पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी केला.
पत्रकार परिषदेत कुंटे पाटील म्हणाले, राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मार्फत महिलांना दरमहा दीड हजार रूपये देण्याची केलेली घोषणा ही धुळफेक असून आगामी विधानसभेत पराभव टाळण्यासाठी महायुती सरकारने केलेली योजना आहे. राज्य सरकारला ग्रामीण भागातील शेतकऱ्याबद्दल खरच जिव्हाळा असेल तर सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करून विज बिल सुध्दा माफ करावे. शेतकरी अडचणीत असून रासायनिक खते व किटकनाशके यांच्या किमतीमध्ये झालेली प्रचंड वाढ, कापूस, सोयाबीन, धान यासारख्या शेती मालाला मिळत असलेला कमी भाव व निसर्गाचे लहरी वातावरण मुळे अडचणीत आहे. त्याकरीता सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना कर्ज माफी व वीज बील माफी देवून दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी माजी आमदार प्रकाश गजभिये, माजी आ. विजय घोडमारे, अविनाश गोतमारे, जाकीर शेख आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद स्तरावर संघटना बांधणी
नागपूर जिल्हयातील सर्व विधानसभा मतदार संघात तालुका निहाय जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर संघटना बांधण्याचे काम नव्याने सुरू करण्यात आले आहे. काटोल विधानसभा मतदार संघातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कल प्रमुखांची व काही तालुका अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आल्याचेही कुंटे पाटील यांनी सांगितले.