‘ते राज्य सरकारलाच विचारा’; औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतर स्थगितीच्या निर्णयावर पवारांची प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 03:05 PM2022-07-15T15:05:59+5:302022-07-15T15:10:04+5:30
शरद पवार एका कार्यक्रमानिमित्त आज नागपुरात आहेत. नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
नागपूर : संसदेच्या दोन्ही सभागृहात शब्दांच्या वापराबाबत जारी करण्यात आलेल्या यादीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. तसंच संसदेच्या आवारात आंदोलनं, निदर्शनं करण्यावरही बंदी घातल्याची माहिती आहे. यावर राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, प्रतिक्रिया दिली.
शरद पवार एका कार्यक्रमानिमित्त आज नागपुरात आहेत. नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी, त्यांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी असंसदीय शब्दांची यादी जारी केल्याबद्दल विचारले असता पवार म्हणाले, आम्हाला संसदेच्या अध्यक्षांकडून याबाबतीत निवेदन मिळालं आहे. अध्यक्षांनी त्यावर अंमलबजावणी करणार नसल्याचं म्हटलं आहे, संसदेच्या आवारात निषेध करण्यास परवानगी नाही, असे कोणतेही निर्बंध नाहीत. उद्या दिल्लीत सर्व राजकीय पक्षांचे नेते एकत्र बसून चर्चा करतील, त्यामुळे सत्य काय आहे ते पाहू.
राज्यात शिंदे-फडणवासी सरकार सत्तेत आल्यानंतर आधीच्या महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा लावलेला आहे. यातच औरंगाबाद शहराचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव नामांतराच्या निर्णयालाही स्थगिती दिल्याचे सांगितले जात आहे. याबाबत प्रश्न विचारला असता हा राज्य सरकारचा विषय असून ‘ते आता राज्य सरकारलाच विचारा’ असं सांगत त्यांनी यावर जास्त भाष्य करणं टाळलं.