भागभांडवल १० हजार उलाढाल कोटींची!
By admin | Published: April 13, 2016 03:03 AM2016-04-13T03:03:43+5:302016-04-13T03:03:43+5:30
श्रीसूर्या समूहाच्या प्रत्येक कंपन्यांमध्ये सर्वेसर्वा समीर जोशी आणि त्याची पत्नी पल्लवी जोशी यांचे भागभांडवल ...
गुंतवणूकदारांच्या पैशांचा दुरुपयोग : समीर जोशीचा अर्ज फेटाळावा, सरकार पक्षाचे न्यायालयात उत्तर
नागपूर : श्रीसूर्या समूहाच्या प्रत्येक कंपन्यांमध्ये सर्वेसर्वा समीर जोशी आणि त्याची पत्नी पल्लवी जोशी यांचे भागभांडवल केवळ १० हजार रुपये असताना उलाढाल मात्र कोटीच्यावर दाखविण्यात आली आहे. जप्त मालमत्ता आपली असल्याचा त्याचा दावा खोटा असून, ही मालमत्ता गुंतवणूकदारांच्या रकमेचा दुरुपयोग करून खरेदी केलेली आहे. त्यामुळे पाच लाख एकमुस्त आणि ५० हजार रुपये महिन्याच्या मागणीचा समीर जोशीचा अर्ज फेटाळला जावा, असे उत्तर सरकार पक्षाच्या वतीने मंगळवारी एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले.
श्रीसूर्या गुंतवणूकदार फसवणुकीचा खटला पुराव्यावर आलेला आहे. जाणीवपूर्वक वेगवेगळ्या हरकती घेऊन समीर जोशीला हा खटला स्थगित करायचा आहे. आरोपी अर्जदाराने हा अर्ज कायद्याच्या चाकोरीत दाखल केलेला नसून तो फेटाळला जावा, असेही सरकार पक्षाचे म्हणणे आहे.
आरोपी अर्जदाराने आपली संपूर्ण मालमत्ता सरकारने जप्त केली आहे, असे अर्जात म्हटले आहे. त्याचे हे म्हणणे खरे नाही. आरोपीची ही मालमत्ता वडिलोपार्जित किंवा स्वयंसंपादित नाही. ही मालमत्ता गुंतवणूकदारांच्या पैशातून खरेदी करण्यात आलेली आहे. २००५ पूर्वी आरोपीकडे कोणतीही मालमत्ता नव्हती, असेही उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे.
आरोपी आणि त्याचे साथीदार गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेल्या पैशाचे विश्वस्त होते. विश्वस्त म्हणून गुंतवणूकदारांच्या पैशांचे रक्षण करण्याऐवजी त्यांनी बेईमानी केली. या पैशाचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करून गुंतवणूकदारांचा विश्वासघात केला.
श्रीसूर्या समूहाच्या एकूण १७ कंपन्या आहेत. ज्या कंपनीचे मूळ भागभांडवल १० हजाराच्या वर नाही, त्या कंपनीची पहिल्याच वर्षाची आर्थिक उलाढाल कोट्यवधीची आहे. ही बाब गुंतवणूकदारांच्या फसवेगिरीचा एक भाग आहे. त्यांनी ही बाब गुंतवणूकदारांपासून लपवून ठेवली आणि खोटी माहिती देऊन गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. हा आरोपींच्या कटाचा एक भाग आहे. आरोपीने श्रीसूर्या डेअरी अॅण्ड फार्मस् ही कंपनी २००८-०९ मध्ये नोंदणी केली. यात समीर जोशीचे नऊ हजार आणि पल्लवी जोशीचे एक हजाराचे भाग भांडवल होते.
समीरच्या आईला येतो झांबियातून पैसा
आरोपी समीर जोशीच्या आईला झांबिया या देशातून २५ हजार रुपये महिना प्राप्त होतो. त्यामुळे आपली आई आणि कुटुंबाचे पालनपोषण होत नाही, असे आरोपीचे म्हणणे खोटे आहे. ही रक्कम त्यांच्या उदरनिर्वाहसाठी पुरेशी आहे. हा पैसा कशासाठी येतो, याबाबत सखोल चौकशी सुरू असल्याचेही उत्तरात नमूद करण्यात आले आहे. आरोपीने गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये स्वीकारूनही त्याने त्याचा संपूर्ण हिशेब दिलेला नाही.बरीचशी संपत्ती त्याने दडवून ठेवलेली आहे. त्याबाबत तपास सुरूच आहे. आरोपीचा हा अर्ज निव्वळ दिशाभूल करणारा आहे. साक्षीपुरावे होऊ नये म्हणून त्याने वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे त्याचा फेटाळल्या जावा, असेही सरकार पक्षाने उत्तरात नमूद केले आहे. न्यायालयात २२ एप्रिल रोजी आरोपीच्या अर्जावर सुनावणी होणार आहे. न्यायालयात आरोपीच्या वतीने अॅड. सुभाष घारे तर सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील अॅड. बी. एम. करडे काम पाहत आहेत. पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे हे तपास अधिकारी आहेत.