दोसर वैश्य आणि प्रजापतीनगर मेट्रो स्टेशनवरून शेअर ऑटो रिक्षा सेवा
By मोरेश्वर मानापुरे | Published: February 17, 2024 06:30 PM2024-02-17T18:30:52+5:302024-02-17T18:31:15+5:30
याआधी ही सेवा कस्तुरचंद पार्क स्टेशनवरून सुरू झाली होती.
नागपूर: ग्राहकांच्या सुविधेसाठी महामेट्रोतर्फे मेट्रो स्टेशनपर्यंत आणि स्टेशनपासून ठराविक स्थानापर्यंत प्रवाशांना पोहचविण्यासाठी दोसर वैश्य आणि प्रजापतीनगर मेट्रो स्टेशनवरून शेअर ऑटो रिक्षा सेवा सुरू झाली आहे. याआधी ही सेवा कस्तुरचंद पार्क स्टेशनवरून सुरू झाली होती. महामेट्रोचे संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) अनिल कोकाटे, व्यवस्थापक (संचालन) सुधाकर उराडे, सहायक प्रादेशिक परिवहन आयुक्त (शहर) रवींद्र भुयार, सहायक प्रादेशिक परिवहन आयुक्त (पूर्व) तुषार हटवार, नागपूर ऑटो संघटनांचे अध्यक्ष जीवन तायवाडे, विलास भालेकर, श्री देवव्रत विश्वास, महामेट्रोचे अधिकारी आणि ऑटो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवून सेवेचा शुभारंभ केला.
तीन स्थानकावरून सुरू झालेली शेअर ऑटोरिक्षा सेवा टप्प्याटप्प्याने उर्वरित स्थानकावरून सुरू होणार आहे. या सेवेचे दर निश्चित आहेत. प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणाने मंजूर केले आहेत. या फिडर सेवेने आवश्यक ठिकाणे जोडली जातील. शहरातील विविध ऑटो रिक्षा संघटनांशी चर्चा करून ही सेवा सुरू झाली आहे. या सेवेसाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर पोलीस वाहतूक शाखा आणि ऑटो रिक्षा संघटनांनी मोलाची मदत केली.