नागपुरात फेसबुकवर फोटो शेअर करणे महागात पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:55 AM2019-10-27T00:55:07+5:302019-10-27T00:56:01+5:30
मैत्रिणीला इम्प्रेस करण्यासाठी एका तरुणाने फेसबुकवर शेअर केलेले फोटो त्याला स्वत:लाच खूप महागात पडले. ते फोटो पाहून त्याचा एक जवळचा मित्रच त्याचा वैरी झाला अन् त्याने त्याचे आपल्या मित्रांच्या माध्यमातून अपहरण करून घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मैत्रिणीला इम्प्रेस करण्यासाठी एका तरुणाने फेसबुकवर शेअर केलेले फोटो त्याला स्वत:लाच खूप महागात पडले. ते फोटो पाहून त्याचा एक जवळचा मित्रच त्याचा वैरी झाला अन् त्याने त्याचे आपल्या मित्रांच्या माध्यमातून अपहरण करून घेतले. पोलिसांना संशय आल्यामुळे एक मोठा गुन्हा टळला. नीरज देवराव वर्मा असे अपहरण करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो बारावीचा विद्यार्थी असून, तो विद्यानगरात राहतो. त्याचा एक मित्र गोव्याला कॅसिनो चालवितो. तू मला एक लाख रुपये दिल्यास मी तुला महिन्याला ३० हजार रुपयांचा फायदा करून देईल, असे नीरजला गोव्याच्या मित्राने सांगितले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून नीरजने त्याला ती रक्कम दिली. त्याने नीरजला किती रक्कम दिली ते कळायला मार्ग नाही. मात्र, नीरजने त्याच्या मैत्रिणीला इम्प्रेस करण्यासाठी तिला आपल्याकडे महिन्याला बक्कळ रक्कम येत असल्याचे सांगितले. तिला विश्वास पटावा म्हणून त्याने तसे फोटोही शेअर केले. ही माहिती नीरजचा एक मित्र अनमोल बाबूलाल डोंगरे (वय २३, रा. मानेवाडा) याला कळली. नीरज काहीतरी मोेठे काम करीत आहे आणि त्याच्याकडे महिन्याला हजारोंची रोकड येत असल्याचा आरोपी अनमोलचा गैरसमज झाला. त्यामुळे त्याचे मित्रांकरवी अपहरण करून लाखोंची रोकड उकळण्याचा कट अनमोलने रचला. त्यानुसार, अनमोलने नीरजला शुक्रवारी दुपारी ३ वाजता फोन करून रामदासपेठमध्ये बोलवून घेतले. नीरज त्याच्या तीन मित्रांसह तेथे आला. आरोपी अनमोलने ठरवून ठेवल्याप्रमाणे तेथे आरोपी किशोर बबनराव चुनटकर (वय ४२, रा. म्हाडा कॉलनी दवलामेटी, वाडी) आणि शहजाद खान हबीब खान (वय ४१, रा. हफीज बेकरी मागे, मोमीनपुरा) पोहचले. आम्ही पोलीसवाले आहोत, तू गैरकायदेशीर काम करतो, असे म्हणत किशोर आणि शहजादने जबरदस्तीने आपल्या वाहनात कोंबले. त्याला वाडी परिसरात निर्जन ठिकाणी नेले. तेथे ते नीरजला मारहाण करीत असतानाच त्या भागात गस्तीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्याकडे धाव घेतली. चौकशीत हा अपहरणाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले.
मात्र, तो धंतोलीतून सुरू झाल्याने वाडी पोलिसांनी धंतोली पोलिसांना कळविले. ठाणेदार विजय आकोत यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.
लालसा भोवली!
मित्राच्या अपहरणाचा कट रचणारा आरोपी अनमोल हा मेडिकल रिप्रेझेन्टेटीव्ह आहे. दिवाळीत झटक्यात लाखो रुपये मिळतील, या लालसेपोटी त्याने अपहरणाचा कट रचला. त्यात आणखी दोघांना सहभागी करून घेतले. मात्र, वेळीच तेथे पोलीस पोहचल्याने त्याचा कट उधळला गेला अन् अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्यात त्याला ऐन दिवाळीच्या दिवसात पोलीस कोठडीत जावे लागले.