नागपुरातील शशी गायधने हत्या प्रकरण : तिघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:28 AM2019-02-19T00:28:23+5:302019-02-19T00:30:16+5:30
रविवारी रात्री शांतिनगरातील प्रवीण ऊर्फ शशी नत्थूजी गायधने (३२) च्या हत्याकांडातील आरोपी कुख्यात गुंड भुऱ्या ऊर्फ ओमप्रकाश लीलाधर नागपुरे (वय २१), त्याचे वडील आणि भाऊ अशा तिघांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, साध्या सरळ स्वभावाच्या शशीची कुख्यात भुऱ्याने हत्या केल्यामुळे रविवार रात्रीपासून या भागात प्रचंड तणाव आणि संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रविवारी रात्री शांतिनगरातील प्रवीण ऊर्फ शशी नत्थूजी गायधने (३२) च्या हत्याकांडातील आरोपी कुख्यात गुंड भुऱ्या ऊर्फ ओमप्रकाश लीलाधर नागपुरे (वय २१), त्याचे वडील आणि भाऊ अशा तिघांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, साध्या सरळ स्वभावाच्या शशीची कुख्यात भुऱ्याने हत्या केल्यामुळे रविवार रात्रीपासून या भागात प्रचंड तणाव आणि संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.
शशी एका कारखान्यात काम करीत होता. तो रविवारी रात्री ७.३० वाजता कामावरून परतला. काही वेळेसाठी तो घराजवळच्या नालंदा चौकात बसला. त्यावेळी तेथे अन्य काही युवकही बसले होते. कुख्यात भुऱ्या तेथे आला आणि तो चौकात शिवीगाळ करीत गोंधळ घालू लागला. त्याने शशीलाही शिवीगाळ केली. शशी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे त्याने शशीला मारहाण केली. वाद वाढवण्याऐवजी शांत स्वभावाचा शशी घरी गेला. काही वेळ आपल्या दोन वर्षीय चिमुकल्यासोबत खेळल्यानंतर तो सामान खरेदी करण्यासाठी बाहेर निघाला. बाजूलाच राहणारा आरोपी लीलाधर नागपुरेने शशीला आवाज दिला. तू भुऱ्याला का रोखले, असा प्रश्न करून लीलाधरने शशीला शिवीगाळ केली. शशी त्याला काही सांगत असतानाच भुऱ्या काठी घेऊन आला. त्याने शशीवर हल्ला चढवला. शशीला त्याने रक्तबंबाळ होईपर्यंत मारले आणि फरार झाला. दरम्यान, आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. मात्र, कुख्यात भुऱ्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या दहशतीमुळे तातडीने शशीला कुणी रुग्णालयात नेण्याची हिंमत दाखविली नाही. १५ ते २० मिनिटे शशी घटनास्थळीच विव्हळत पडून होता. यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याला रुग्णालयात नेले तेव्हा डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. घटनेची सूचना मिळताच शांतिनगर पोलीस तसेच परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर भुऱ्याच्या घरी पोहोचले. तोपर्यंत शशीच्या हत्येची माहिती परिसरातील नागरिकांना कळाल्याने तेथे मोठा तणाव निर्माण झाला होता. भुऱ्या आणि त्याच्या परिवाराची या भागात कशी दहशत आहे, त्याबाबत संतप्त नागरिकांनी उपायुक्त माकणीकर यांना माहिती देऊन गुन्हेगारांना तातडीने अटक करण्याची मागणी केली.
भुऱ्या तसेच त्याचे गुंड वडील आणि भाऊ कुंदन अवैध धंदे करतात. ते कारण नसताना कुणालाही मारहाण करतात. शांतिनगर पोलिसांशी देण्या-घेण्याचे संबंध असल्यामुळे पोलीस त्यांच्याविरुद्ध ठोस कारवाई करीत नाही. त्यामुळे भुऱ्या आणि त्याच्या कुटुंबीयांची हिंमत वाढली. त्याचमुळे त्यांनी एका सरळ साध्या गरीब तरुणाचा बळी घेतला, असेही सांगितले. ते ऐकून संतप्त झालेल्या उपायुक्त माकणीकर यांनी शांतिनगर पोलिसांना आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले.
पोलिसांवरही व्हावी कारवाई
शशीच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबात आई मीराबाई, पत्नी प्रियंका आणि दोन वर्षांचा मुलगा सौम्य आहे. शशीच्या भरवशावरच घर चालत होते. शशी सरळ स्वभावाचा युवक होता. त्याचे कुणाशीही वैर नव्हते. त्याची हत्या केल्याने भुऱ्या व त्याच्या कुटुंबाविरुद्ध नागरिकांमध्ये प्रचंड रोष पसरला. तो लक्षात घेता, पोलिसांनी कुख्यात भुऱ्या, त्याचे वडील लीलाधर आणि भाऊ कुंदनला अटक केली.
शशीचा मृतदेह त्याच्या घरी आणला तेव्हा या भागाातील तणावात भर पडली. नागरिकांनी भुऱ्याच्या गुन्हेगारी वृत्तीला आणि त्याच्या कुटुंबीयांच्या अवैध धंद्यांना आश्रय देणाऱ्या शांतिनगर पोलिसांच्या कृतीचा निषेध नोंदवला. शांतिनगर घाटावर दुपारी शशीवर त्याच्या दोन वर्षीय सौम्य नामक चिमुकल्याने चुलत काकाच्या मदतीने अंत्यसंस्कार केले. यावेळी अनेकांना हुंदके आवरणे कठीण झाले होते. यावेळी शोकसंतप्त नागरिकांनी भुऱ्या तसेच त्याच्या कुटुंबीयांना मदत करणाऱ्या शांतिनगरातील पोलिसांवर कडक कारवाईची मागणी केली. भुऱ्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला पोलिसांनी हॉटेलचे जेवण दिल्याचाही संतप्त नागरिकांनी आरोप केला.