शशिकांत सावळे नागपूरचे नवीन प्रधान जिल्हा न्यायाधीश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:22 AM2018-06-29T00:22:01+5:302018-06-29T00:22:39+5:30
नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे विद्यमान प्रधान न्यायाधीश व्ही. डी. डोंगरे हे येत्या ३० जून रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागेवर मुंबईतील औद्योगिक न्यायालयाचे अध्यक्ष शशिकांत सावळे यांना नियुक्ती देण्यात आली आहे. यासंदर्भात गुरुवारी अधिसूचना जारी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे विद्यमान प्रधान न्यायाधीश व्ही. डी. डोंगरे हे येत्या ३० जून रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागेवर मुंबईतील औद्योगिक न्यायालयाचे अध्यक्ष शशिकांत सावळे यांना नियुक्ती देण्यात आली आहे. यासंदर्भात गुरुवारी अधिसूचना जारी करण्यात आली.
सावळे यांची २००२ मध्ये थेट भरतीद्वारे जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. तत्पूर्वी यांनी शाहदा, नंदूरबार व धुळे जिल्हा न्यायालयात २० वर्षे वकिली व्यवसाय केला. त्यांनी यापूर्वी नागपूर, नाशिक व औरंगाबाद येथे जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्य केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात त्यांची व्यवस्थापक (प्रशासन) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी २०१० ते २०१३ पर्यंत मुंबई येथील लघु वाद न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य केले. जून-२०१३ ते फेब्रुवारी-२०१५ पर्यंत ते मुंबईतील सहकार अपिलीय न्यायालयाचे अध्यक्ष होते. मार्च-२०१५ ते आॅगस्ट-२०१७ या कालावधीत त्यांनी धर्मादाय आयुक्त म्हणून कार्य केले. दरम्यान, त्यांनी विक्रमी ७० हजार प्रकरणे निकाली काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आॅगस्ट-२०१७ पासून ते मुंबईतील औद्योगिक न्यायालयात कार्यरत आहेत. ते नागपुरात येणार असल्यामुळे विधी वर्तुळात आनंद व्यक्त केला जात आहे.