दिवाळीनंतर होणार राजकीय ‘धमाका’, शत्रुघ्न सिन्हा यांचे संकेत; यवतमाळ हाऊस येथे विजय दर्डा यांची घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 03:14 AM2018-10-08T03:14:47+5:302018-10-08T03:18:37+5:30
लोकसभा निवडणुकाच्या तोंडावर दिवाळीनंतर देशातील राजकीय समीकरणे वेगाने बदलतील. सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा राजकीय ‘धमाका’देखील होईल. बिहारमध्ये याचा प्रभाव स्पष्टपणे पहायला मिळेल, अशी माहिती बिहारमधील प्रभावी नेता व भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली.
नागपूर : लोकसभा निवडणुकाच्या तोंडावर दिवाळीनंतर देशातील राजकीय समीकरणे वेगाने बदलतील. सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा राजकीय ‘धमाका’देखील होईल. बिहारमध्ये याचा प्रभाव स्पष्टपणे पहायला मिळेल, अशी माहिती बिहारमधील प्रभावी नेता व भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली. रविवारी नागपुरात आले असताना शत्रुघ्न सिन्हा यांनी यवतमाळ हाऊस येथे लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांची भेट घेतली. यावेळी दर्डा यांनी खा.सिन्हा व मुंबई कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय निरुपम यांचे स्वागत केले.
नागपुरात रविवारी उत्तर भारतीय सभेच्या माध्यमातून हिंदी भाषिक नेत्यांना एका मंचावर आणून हिंदी ‘व्होटबँक’ मजबूत करण्याचा प्रयत्न झाला. या कार्यक्रमासाठी शत्रुघ्न सिन्हा व संजय निरुपम आले होते.
‘लोकमत’शी संवाद साधताना सिन्हा यांनी विविध राजकीय मुद्यांवर भाष्य केले. बिहारमध्ये भाजपासोबत हातमिळावणी केल्यानंतर नितीश कुमार यांना अस्वस्थता जाणवत आहे. दुसरीकडे राष्ट्रीय पातळीवर तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी, ‘आरजेडी’प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यासह विविध नेते एकत्र येत आहेत. भाजपाबाबत लोकांमध्ये संताप आहे. मीदेखील निर्णायक टप्प्यावर पोहोचलो आहे. मात्र पुढील पावलांबाबत योग्य वेळ आल्यावर दिवाळीनंतरच घोषणा करेल, असे सिन्हा यांनी सांगितले.
दिल्ली व बिहार येथे भाजपाच्या झालेल्या पराभवावर बोलत असताना सिन्हा म्हणाले की, भाजपाविरोधात नकारात्मक वातावरण तयार होत आहे. तेथे पैसे खर्च केल्यानंतरदेखील भाजपाचा पराभव झाला.
‘व्हीव्हीपॅट’मुळे पारदर्शकता येईल
‘बॅलेट पेपर’च्या काळात ‘बूथ कॅप्चरिंग’ व्हायचे. आता ‘ईव्हीएम’चा काळ आहे. मात्र यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. निवडणूक आयोगाने ‘ईव्हीएम’सोबत ‘व्हीव्हीपॅट’ मशीन लावल्याने पारदर्शकता येईल. निवडणुकांचे निकाल पूर्णत: जनतेच्या हाती असतील, असे सिन्हा यांनी सांगितले.
पाकिस्तानमध्ये इम्रान खान चक्रव्यूहात फसले आहेत. त्यांना ‘डेड इकॉनॉमी’ हाती मिळाली आहे. ते सैन्याच्या हातातील बाहुले आहेत. पाकिस्तानने चर्चेसाठी भारतासमोर हात पुढे केला होता. मात्र केंद्राने त्याला नकार दिला. हे पाऊल अयोग्य आहे. पाकिस्तान भिक्षा मागत आहे. तेथे केवळ दोन महिन्यांचेच धान्य उरले आहे, अशी भावना सिन्हा यांनी व्यक्त केली.