अन् तिने प्रेमच स्वीकारले
By admin | Published: October 29, 2015 03:15 AM2015-10-29T03:15:49+5:302015-10-29T03:15:49+5:30
खामला येथील एका राजकीय नेत्याच्या मुलीने छत्तीसगडच्या मुलासोबत प्रेमसंबंधातून पळून जाऊन लग्न केले.
नागपूर : खामला येथील एका राजकीय नेत्याच्या मुलीने छत्तीसगडच्या मुलासोबत प्रेमसंबंधातून पळून जाऊन लग्न केले. आपल्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा दावा करून तिला न्यायालयात हजर करण्यासाठी नेत्याने रिट याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुलीला व तिच्या पतीला पोलीस संरक्षणात न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्या मुलीने न्यायालयातही नातेसंबंधाचा सर्व दबाव झुगारून केवळ स्वत:चे प्रेम म्हणजे तिच्या पतीलाच स्वीकारले. अशाप्रकारे नेत्याचा दावा फोल ठरून प्रेमीयुगुलाचे विवाहबंधन कायम राहिले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल या प्रकरणाचा एक अंक बुधवारी संपला. न्यायालयाने मुलीचे बयान लक्षात घेता नेत्याची याचिका निकाली काढली. दुसरा अंक मुलाविरुद्धची एफआयआर रद्द करण्यासंदर्भात असून त्यावर चार आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे. कविता व सचिन (काल्पनिक नावे) अनेक दिवस एकमेकांच्या संपर्कात राहिल्यानंतर प्रेमात पडले. सचिन शिक्षणासाठी गेल्या सहा वर्षांपासून नागपुरात राहात होता. सचिन हा कविताच्या चुलतभावाचा मित्र होता. यामुळे त्याची कवितासोबत ओळख झाली होती. कविताचे कुटुंबीयही सचिनशी परिचित होते. २ जुलै २०१५ रोजी कविता कोणालाही न सांगता सचिनसोबत छत्तीसगडला निघून गेली. शोधाशोध करूनही काहीच माहिती न मिळाल्यामुळे कविताच्या वडिलाने ५ जुलै रोजी राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंदविली. त्यात सचिनवर अपहरणाचा आरोप केला. त्यावरून सचिनविरुद्ध भादंविच्या कलम ३६४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कविता व सचिनने २ जुलै रोजी दुर्ग येथील आर्य समाज मंदिरात लग्न केले आहे.
पोलिसांकडून ही बाब कळल्यानंतर कविताच्या वडिलाचा यावर विश्वास बसला नव्हता. यामुळे त्यांनी कविताला न्यायालयात उपस्थित करण्यासाठी याचिका दाखल केली होती. सचिन व तिच्या कुटुंबीयांनी कविताला बळजबरीने स्वत:च्या ताब्यात ठेवले आहे. कविताच्या जीवाला धोका आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता.(प्रतिनिधी)
वडिलांना दिला नाही प्रतिसाद
कविता व सचिनचे कुटुंबीय न्यायालयात उपस्थित होते. कविता ही सचिन व त्याच्या कुटुंबीयांसोबत होती. कविता न्यायालयाच्या कक्षात प्रवेश करीत असताना तिचे वडील, आई व इतर नातेवाईक पुढेच उभे होते. ते सर्व कविताकडे आपुलकीने पहात होते. वडिलांच्या डोळ्यात थोडा राग होता. परंतु, कविताने कुणालाही प्रतिसाद न देता थेट न्यायालयाच्या कक्षात प्रवेश केला. वडिलांनी कविताकडे पाहून ‘हे तुने चांगले केले नाही’ असे म्हणावे त्याप्रमाणे खाली-वर मान हलवली.
सचिनच्या अर्जावर नोटीस
कविताच्या वडिलांच्या तक्रारीवरून राणा प्रतापनगर पोलिसांनी नोंदविलेला अपहरणाचा एफआयआर रद्द करण्यासाठी सचिनने उच्च न्यायालयात अर्ज सादर केला आहे. न्यायालयाने बुधवारी पोलीस निरीक्षकाला नोटीस बजावून यावर चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. तसेच, या कालावधीत सचिनला अटक करण्यात येऊ नये, असा अंतरिम आदेश पोलिसांना दिला.