‘ती’ मागते न्यूड फोटो,’ते‘ मागतात खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:15 AM2021-09-02T04:15:51+5:302021-09-02T04:15:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सोशल प्लॅटफॉर्मवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवून टोळीतील तरुणी वेगवेगळे तरुण, पुरुषांसोबत मैत्री करते. काही दिवस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोशल प्लॅटफॉर्मवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवून टोळीतील तरुणी वेगवेगळे तरुण, पुरुषांसोबत मैत्री करते. काही दिवस सलग चॅटिंग करून अचानक त्यांना व्हॉट्सॲपवरून न्यूड फोटो पाठवायला सांगते. नंतर तिचे साथीदार संबंधित व्यक्ती आणि नातेवाईकांना त्याचे न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागतात. खंडणी उकळण्याचा हा नवा फंडा गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या टोळ्यांकडून अमलात आणला गेला आहे. सक्करदऱ्यातील अशाच एका टोळीचा छडा लावून पोलिसांनी या टोळीतील एका भामट्याला अटक केली आहे.
राैनक प्रभू वैद्य असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून तो हुडकेश्वरमधील पिपळा फाटा भागात राहतो. त्याच्या टोळीतील तन्वयी नावाच्या एका मुलीने काही महिन्यांपूर्वी सक्करदऱ्यातील एका तरुणाला इन्स्टाग्रामवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. तरुणाने एक्सेप्ट केल्यानंतर त्यांच्यात चॅटिंग सुरू झाली. नंतर ते व्हॉट्सॲपवर बोलू लागले. तो चक्क सभागृहाचा मालक असल्याचे लक्षात आल्यानंतर तन्वयीने त्याला थेट न्यूड फोटो पाठवायला सांगितले. तरुणाने तसेच केले. नंतर १ मे रोजी तरुणाला एकाचा फोन आला. तुझे आमच्याकडे न्यूड फोटो आहेत. ते व्हायरल करेन अशी धमकी देऊन पहिल्या वेळी दीड हजार, दुसऱ्यांदा पाच आणि तिसऱ्यांदा ६ हजार रुपये तरुणाकडून उकळले. बदनामीचा धाक दाखवून आरोपी वारंवार पैसे मागत असल्याने तरुण दहशतीत आला. त्याने आपल्या वडिलांना हा प्रकार सांगून आरोपींना पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे आरोपी राैनक काही दिवसांपूर्वी थेट तरुणाच्या घरी पोहचला. तरुणाचे वडील आणि त्याच्या काकांना न्यूड फोटो दाखवून तुमचा मुलगा माझ्या नात्यातील तरुणीसोबत अश्लिल चॅटिंग करतो, असे सांगून त्याचे न्यूड फोटो दाखविले. हे प्रकरण मिटवायचे असेल तर ५० हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुमची बदनामी करू. पोलीसही कारवाई करतील, अशी धमकी आरोपीने दिली. तरुणाच्या वडिलांनी खंडणी देण्याचे मान्य करून सोमवारी त्याला रक्कम घेण्यासाठी मंगल कार्यालयात बोलविले. दुसरीकडे सक्करदरा पोलिसांकडे तक्रार केली. ठरल्याप्रमाणे आरोपी राैनक वैद्य ५० हजारांची खंडणी घेण्यासाठी फिर्यादीच्या कार्यालयात पोहचला. त्याने खंडणी स्वीकारताच दबा धरून बसलेल्या सक्करदरा पोलिसांनी आरोपीला अटक केली.
----
किती जणांना केले ब्लॅकमेल?
राैनकला न्यायालयात हजर करून सक्करदरा पोलिसांनी दोन दिवसांचा पीसीआर मिळवला. त्याच्या टोळीत तन्वयी आणि आणखी किती जण आहेत तसेच त्यांनी अशा प्रकारे किती जणांना ब्लॅकमेल केले, त्याची चाैकशी केली जात असल्याचे सक्करदराचे ठाणेदार धनंजय पाटील यांनी लोकमतला सांगितले.
-----