‘ती’ बनली वंचित आदिवासींची ‘आरोग्यदूत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 10:04 AM2018-05-15T10:04:48+5:302018-05-15T10:04:57+5:30

एमबीबीएसनंतर आपल्या एक वर्षाच्या बॉण्डमधून रुग्णसेवेसाठी तिने अगदी ठरवून गडचिरोलीचे दुर्गम खेडे निवडले. डॉ. रितु दमाहे असे या तरुण डॉक्टरचे नाव.

'She' became a Health care taker of tribals | ‘ती’ बनली वंचित आदिवासींची ‘आरोग्यदूत’

‘ती’ बनली वंचित आदिवासींची ‘आरोग्यदूत’

Next
ठळक मुद्देएमबीबीएसनंतर जाणीवपूर्वक निवडले गडचिरोलीचे दुर्गम खेडे

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गडचिरोली म्हणजे राज्याचे शेवटचे टोक. २४ तास नक्षल्यांची दहशत, रस्ते नाहीत, वीज नाही, चारीकडे निबिड अरण्य आणि या अरण्यात मुक्त संचार करणारे हिंस्र पशू. या जिल्ह्यात नोकरी आजही अनेकांना काळ्या पाण्याची शिक्षा वाटते. इथे एखाद्याची बदली झालीच तर तो सारी शक्ती पणाला लावून ती रद्द करतो. परंतु नुकतीच डॉक्टर झालेली एक तरुणी मात्र फारच जिगरबाज निघाली. एमबीबीएसनंतर आपल्या एक वर्षाच्या बॉण्डमधून रुग्णसेवेसाठी तिने अगदी ठरवून गडचिरोलीचे दुर्गम खेडे निवडले. डॉ. रितु दमाहे असे या तरुण डॉक्टरचे नाव. बालपण ते तरुणपण निव्वळ गरिबी पाहिलेली ही तरुणी डॉक्टर झाल्यावरही बदलली नाही अन समाजाचे ऋण फेडण्यासाठी थेट गडचिरोलीला पोहोचली. तिचीच ही साहसकथा...
मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील कुमली या छोट्याशा गावातील डॉ. रितु दमाहे. वडील शेतकरी. भूक परवडली, पण आजार नको तिने लहानपणीच पाहिलेले. म्हणूनच की काय अभ्यासाच्या जोरावार वैद्यकीय क्षेत्राकडे वळली. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेयो) एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण केला. या अभ्यासक्रमानंतर ग्रामीण रुग्णालयात एक वर्ष ‘इन्टर्नशिप’ तर दुसऱ्या वर्षी मेडिकल अधिकारी ‘एमओशिप’ करावी लागते. परंतु एमबीबीएसला विचारते कोण, म्हणून बहुसंख्य विद्यार्थी कशीतरी इन्टर्नशिप पूर्ण करून ‘एमओशिप’ म्हणजे ग्रामीण भागात रुग्णसेवा देण्याच्या बॉण्डमधील पळवाटांना जवळ करतात. कुणी पैसे देऊन, कुणी ओळखीने तर कुणी विविध मार्गाने या बॉण्डला बगलच देतात. अशी विदारक स्थिती असतानाही डॉ. रितु दमाहे हिने आपल्या ‘बॉण्ड’मधून रुग्णसेवा घडण्यासाठी कुठल्या ग्रामीण रुग्णालयाची निवड केली नाही तर शासनाच्या प्रकल्पातील सर्च फाऊंडेशनच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या ‘मा दंतेश्वरी फिरता दवाखान्या’ची निवड केली. या दवाखान्याची निवड फारसे कुणी करीत नाही. कारण, जिथे रस्ते नाहीत, वीज नाही, सोई नाहीत अशा लांब पट्ट्यातील गावांमध्ये हा दवाखाना जाऊन रुग्णसेवा देतो. या गावामध्ये जाऊन रुग्णसेवा देण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा कितीतरी तास हा प्रवासात जातो आणि तोही खाच खळग्यातील सीटवरून, उसळतच चालणारा प्रवास. त्या फिरत्या दवाखान्यातून रुग्णसेवा देताना तिला येत असलेले अनुभव विचार करायला लावणारे असेच आहेत. फोनवरून तिच्याशी संवाद साधला असता ती म्हणाली, गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील अनेक दुर्गम भागात उपचाराच्या सोई पोहचलेल्या नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, परंतु डॉक्टर राहत नाही. गरिबी तर पाचवीला पुजलेली. अंग झाकायला जिथे चिंध्या आहेत, तिथे स्वत:च्या आरोग्याची कोण पर्वा करणार. एक वेळचं पोटभर जेवण मिळालं तरी तिथे भाग्य लाभलं हा समज. भूक मिटविण्यासाठी चघळला जाणारा तंबाखू, यातून नंतर समोर येणारे विविध आजार. गावात फिरता दवाखाना आला म्हणून उपचार, नाही तर अंगावर आजार काढले जातात किंवा वैदूचा झाडपाल्याचा उपचार आहेच. अनेकवेळा फिरता दवाखाना येऊनही फारसे कुणी येत नाही. जे येतात ते फाटके त्यातही कमी फाटके असलेले कपडे घालून येतात. त्यांचा तो केविलवाणा चेहरा पाहताना काय झाले, हे विचारण्याचे धाडसही होत नाही. वृद्ध महिला चिंध्या गुंडाळून येतात. या चिंध्याही केवळ कंबरेखालची लाज झाकावी एवढ्याच. यांच्यावर कोणता उपचार करावा म्हणजे त्यांचे हे दारिद्र्य सुटेल हा, प्रश्न नेहमी पडतो. त्या स्थितीही त्यांना प्रेमाने विचारपूस आणि स्पर्श केल्यावर डबडबणारे त्यांचे डोळे पाहून स्वत:ला आवरणे कठीण होते. रोज अशा नवनव्या प्रसंगातून जाते. भविष्यात अशाच रुग्णांसाठी आपली सेवा समर्पित करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला बळ देते.

Web Title: 'She' became a Health care taker of tribals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.