‘ती’ दुचाकीसह उड्डाणपुलाहून खाली पडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 11:33 PM2020-08-13T23:33:50+5:302020-08-13T23:37:11+5:30

स्कॉर्पिओने समोरच्या दुचाकीला जोरदार धडक मारल्यामुळे दुचाकीवरील मंजुषा मारुती दलाल (वय ३६) नामक परिचारिकेचा उड्डाणपुलावरून खाली पडून करुण अंत झाला.

‘She’ fell off the flyover with her bike! | ‘ती’ दुचाकीसह उड्डाणपुलाहून खाली पडली!

‘ती’ दुचाकीसह उड्डाणपुलाहून खाली पडली!

Next
ठळक मुद्दे परिचारिकेचा अंत : मानकापूर उड्डाणपुलावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्कॉर्पिओने समोरच्या दुचाकीला जोरदार धडक मारल्यामुळे दुचाकीवरील मंजुषा मारुती दलाल (वय ३६) नामक परिचारिकेचा उड्डाणपुलावरून खाली पडून करुण अंत झाला.


गुरुवारी दुपारी मानकापूरच्या उड्डाणपुलावर हा भीषण अपघात घडला.
मंजुषा गोधनीच्या कलेक्टर कॉलनीत राहत होती. ती धंतोलीतील एका खासगी इस्पितळात परिचारिका म्हणून सेवारत होती. नेहमीप्रमाणे ती तिच्या अ‍ॅक्टिव्हाने गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास कर्तव्यावर जाण्यासाठी निघाली. उड्डाणपुलावर मानकापूर ते पागलखाना चौक मार्गावर तिच्या दुचाकीला मागून निष्काळजीपणे वेगात येणाऱ्या स्कॉर्पिओ (क्रमांक एमपी २२/ टी ०८७६) च्या चालकाने दुचाकीला जोरदार धडक मारली. स्कॉर्पिओचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्यामुळे मंजुषा उड्डाणपुलावरून खाली पडली. तिच्या दुचाकीचीही पुरती मोडतोड झाली. मंजुषा रक्ताच्या थारोळ्यात कोसळून जागीच गतप्राण झाली. दरम्यान, पुलावरून तरुणी खाली पडल्याचे पाहून आजूबाजूच्यांनी एकच आरडाओरड केला. काहींनी नियंत्रण कक्षाला फोन केले. त्यानंतर सदर पोलीस घटनास्थळी धावले. दरम्यान, आरोपी स्कॉर्पिओचालक मानकापूर चौकाजवळ वाहन सोडून पळून गेला. त्याच्या वाहनाच्या नंबरप्लेटचेही तुकडे तुकडे झाले होते. दुचाकीच्या क्रमांकावरून पोलिसांनी मृत मंजूषाच्या घरच्यांशी संपर्क साधला. त्यानंतर मृत मंजुषाची बहीण शहर पोलिस दलात वायरलेस विभागात काम करत असल्याचेही स्पष्ट झाले.

दुसऱ्याच चालकाला पकडले
मंजुषाचा बळी घेणारा स्कॉर्पिओ चालक असल्याचे कळाल्यामुळे पोलिसांनी आरोपीची शोधाशोध केली. संशयावरून दुसऱ्याच एका स्कॉर्पिओचालकाला ताब्यात घेतले. मात्र मानकापूर चौकात अपघातग्रस्त स्कॉर्पिओ उभी असल्याचे कळाल्यानंतर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ती ताब्यात घेतली. तुटलेल्या नंबरप्लेटला जोडून स्कॉर्पिओचा नंबर मिळवला आणि आरोपीचा शोध सुरू केला.

बहिणीच्या अपघाताने ती सुन्न पडली
पोलीस दलात असलेल्या मंजुषाच्या बहिणीने तिच्या अपघाती मृत्यूचे वृत्त ऐकले आणि ती काही वेळेसाठी सुन्नच पडली. तिने सांगितलेल्या माहितीनुसार, मंजुषा तिला या उड्डाणपुलावरून जात नको जाऊ, असे नेहमी बजावत होती. या पुलावरून वाहनचालक अतिशय वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवितात, असेही सांगत होती. आज ती स्वत:च त्या उड्डाणपुलावरून दुचाकीने निघाली आणि निष्काळजी वाहनचालकाने तिचा बळी घेतला.

Web Title: ‘She’ fell off the flyover with her bike!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.