ती लढतेय कोरोनाशी, रुग्णांना जगविण्यासाठी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:14 AM2021-05-05T04:14:24+5:302021-05-05T04:14:24+5:30
अभय लांजेवार उमरेड : मोठमोठ्या शहरात खासगी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवेच्या मोबदल्यात रग्गड पैसा कमविण्याची संधी असतानाही असंख्य डॉक्टर, परिचारिका ...
अभय लांजेवार
उमरेड : मोठमोठ्या शहरात खासगी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवेच्या मोबदल्यात रग्गड पैसा कमविण्याची संधी असतानाही असंख्य डॉक्टर, परिचारिका आपत्ती व्यवस्थापन समिती अंतर्गत कोविड सेंटरमध्येच अल्प मानधनावर सेवाभाव जपत आहेत. यापैकीच एक डॉ. निवेदिता संजय निशाने. वर्षभरापासून अविरतपणे रुग्णसेवेचा सेवाभाव त्यांनी जपला. म्हणूनच आज अनेक कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांच्या कार्याची प्रशंसा करीत आहेत. मूळच्या गडचिरोली येथील निवासी असलेल्या डॉ. निवेदिता निशाने यांनी कोविड केअर सेंटरमध्ये नागपूर जिल्ह्यासाठी अर्ज सादर केला होता. त्यांची उमरेड येथील कोविड सेंटरमध्ये नियुक्ती करण्यात आली. सुरुवातीला केवळ त्या एकमेव वैद्यकीय अधिकारी आणि दोन परिचारिकांच्या बळावर कोविड सेंटर त्यांनी उत्तमरीत्या हाताळले. उमरेडच्या स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक संकुल येथील कोविड सेंटरमध्ये सुविधांचा अभाव असतानाही त्यांनी आहे त्या परिस्थितीत सेवा प्रदान केली. कधी बारा, कधी पंधरा तास, तर कधी त्यापेक्षाही अधिक वेळ कर्तव्य पार पाडल्यानंतरही मी निराश झाले नाही. माझ्याकडून कोविड रुग्णांची सेवा घडत आहे. यातूनच आनंद मिळतो. हे जरी सत्य असले तरी वैयक्तिक आयुष्यावर याचा परिणाम निश्चितच होतो, ही बाबसुद्धा महत्त्वाची असल्याचे निवेदिता यांनी सांगितले. डॉ. निवेदिता यांचे वडील संजय निशाने हे शिक्षक आहेत. आई मीनाक्षी एनजीओमध्ये सदस्य आहेत. मुलीने लोकोपयोगी कार्य करावे, हे सकारात्मक विचार मी त्यांच्याकडूनच अंगीकारले, असे निवेदिता यांनी सांगितले.
- तर सेंटर सोडले असते
माझ्यासारखे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असंख्य तरुण-तरुणी आहेत. केवळ पैसा मिळतो म्हणून मी डॉक्टर झाले, असा विचार माझ्या मनात डोकावत असेल, तर मग आपल्यातील माणुसकीला काहीही अर्थ उरणार नाही. अनेकांना दोनवेळचे अन्नसुद्धा कठीण झाले आहे. अशावेळी आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले पाहिजे. केवळ पैशांसाठी मी वैद्यकीय शिक्षण घेतले असते अथवा तसे संस्कार माझ्यावर बिंबविण्यात आले असते, तर मी केव्हाच उमरेडचे कोविड सेंटर सोडून एखाद्या खासगी हॉस्पिटलमध्ये सेवा दिली असती, असे वास्तविक परिस्थितीला स्पर्श करणारे विचारही त्यांनी मांडले.
--
कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास लगेच चाचणी करणे आणि औषधोपचारासाठी तातडीने संबंधित डॉक्टरचा सल्ला घेणे गरजेचे आहे. स्कोर अधिक आणि ऑक्सिजन लेवल कमालीची खालावली असतानाही असंख्य रुग्ण योग्य उपचाराने बरे झाले आहेत. तेव्हा हिंमतीने, आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची गरज आहे.
- डॉ. निवेदिता निशाने, वैद्यकीय अधिकारी, उमरेड कोविड सेंटर