चहाटपरीच्या भरवशावर ‘तिने’ फुलविला नागपुरात संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:05 PM2018-03-08T12:05:53+5:302018-03-08T12:06:36+5:30

समाजातील कुप्रथा, निराधार विधवेकडे पांढरपेशांचा बघण्याचा दृष्टिकोन, यातून आलेल्या कडू, गोड अनुभवाच्या आधारे जीवनक्रम पुढे नेत ‘तिने’ तीन मुलांचा संसार फुलविला आहे. आज तीन मुले, तीन सुना व आठ नातवंड अशा मोठ्या परिवाराचा डोलारा उभा आहे.

She 'flaunted' the world over her reliance on Tea stall | चहाटपरीच्या भरवशावर ‘तिने’ फुलविला नागपुरात संसार

चहाटपरीच्या भरवशावर ‘तिने’ फुलविला नागपुरात संसार

googlenewsNext

श्याम नाडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बालपणात लग्न, तरुण वयात वैधव्य, तीन लहान मुलांच्या भरणपोषणाची जबाबदारी आणि घरात अठरा विश्वे दारिद्र्य. पण न डगमगता, आत्मविश्वासाने आलेल्या परिस्थितीवर मात केली. समाजातील कुप्रथा, निराधार विधवेकडे पांढरपेशांचा बघण्याचा दृष्टिकोन, यातून आलेल्या कडू, गोड अनुभवाच्या आधारे जीवनक्रम पुढे नेत ‘तिने’ तीन मुलांचा संसार फुलविला आहे. आज तीन मुले, तीन सुना व आठ नातवंड अशा मोठ्या परिवाराचा डोलारा उभा आहे. गेल्या २७ वर्षांपासून सकाळी ५ ते रात्री ११ वाजेपावेतो सतत काम करताना बेबीबाईला लोक बघत आहेत.
नरखेडच्या तहसील कचेरीसमोर चहा टपरी चालविणाऱ्या बेबीबाई ढोरे या ५२ वर्षीय महिलेची ही कथा. मध्य प्रदेशातील नारायण पिपळा येथून १५ व्या वर्षी लग्न होऊन सुखी संसाराचे स्वप्न घेऊन नरखेडला आली. १२ वर्षे पतीसह काबाडकष्ट करून तीन मुलांना जन्म दिला. परंतु पतीला कॅन्सरने ग्रासले आणि त्यांचे निधन झाले. वयाच्या २७ व्या वर्षी वैधव्य आले. घरी स्थिती हलाखीची, त्यात तीन चिमुकल्याची जबाबदारी. मात्र न डगमगता, हिमतीने असलेल्या परिस्थितीचा सामना केला. पाठीला केवळ दुसरीपर्यंत शिक्षण. त्यामुळे शेतमजुरी केली. तीन मुलांचे पालनपोषण करताना शेतमजुरी अत्यंत तोकडी होती. परिस्थितीचा फायदा उचलणारेही मिळाले, त्यांचाही सामना केला.
शैक्षणिक ज्ञान नसल्याने तहसील कार्यालयात झाडू मारण्याचे काम मिळाले. यातून मजुरी अधिक मिळू लागली. अशात ओळखी वाढल्याने अनेक मदतीचे हात समोर आले. तहसील कार्यालयाच्या आवारात चहा टपरी सुरू केली. तेथेही व्यवहार, आकडेमोड नसल्याने अनेकांनी गंडविले. यातून धडा घेत हळुहळु आत्मविश्वास वाढत गेला. जेवणाच्या आॅर्डर घेणे, डबे पुरविणे, साहेबांकडे स्वयंपाक करणे, कार्यालयात सफाई करणे, पाणी भरणे सुरू झाले. दोन पैशांची बचत होऊ लागली. तिन्ही मुलांची लग्न लावून दिली. त्यांच्याकरिता जागा विकत घेतली व त्यांचा संसार मार्गी लावला.
बेबीबार्इंच्या रोजच्या दिनचर्येमध्ये पहाटे ५ वाजता उठणे नित्याचे झाले. सकाळीच तहसील कार्यालयाची झाडझूड करणे, पाणी भरणे, नंतर डबे तयार करून ते पोहचविणे त्यानंतर चहा टपरीची जुळवाजुळव करून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत हसतमुखाने ग्राहकांना चहा पाजणे. वेळेवर आलेले ज्वारीच्या भाकरीची आॅर्डर पूर्ण करणे, स्वयंपाक करणे, डबे पोहचविणे, भांड्यांची आवराआवर करून जेवण करणे असा त्यांचा दिनक्रम ठरला आहे.
कुठलेही भागभांडवल, आधार नसताना केवळ अकुशल हुशारी व आत्मविश्वास, शांत-संयमाच्या बळावर बेबीबाईने दैवाने दिलेली जबाबदारी पूर्ण केली. तिन्ही मुलांचा मोठा आनंदी परिवार बेबीबार्इंचा आरसा आहे. ग्रामीण भागात दारिद्र्य कुटुंबातील स्त्रियांकरिता बेबीबाई एक प्रेरणादायी उदाहरण ठरतील.

Web Title: She 'flaunted' the world over her reliance on Tea stall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.