आत्महत्या करणाऱ्या पतीचे तिने पाय नव्हे, धरून ठेवले प्राण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 08:41 PM2021-10-30T20:41:15+5:302021-10-30T20:42:39+5:30

Nagpur News स्वत:ला गळफास लावून घेतलेला पती शेवटचे आचके देत असल्याचे पाहत पत्नीचा अंगाचा थरकाप उडाला. काही कळायच्या आत तिने पतीचे पाय वर उचलून धरले.

She held the life of her suicidal husband, not her legs! | आत्महत्या करणाऱ्या पतीचे तिने पाय नव्हे, धरून ठेवले प्राण!

आत्महत्या करणाऱ्या पतीचे तिने पाय नव्हे, धरून ठेवले प्राण!

googlenewsNext
ठळक मुद्देपत्नीच्या धैर्य व हिंमतीमुळे पतीला मिळाले नवे जीवन मेडिकल डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश

सुमेध वाघमारे

नागपूर : स्वत:ला गळफास लावून घेतलेला पती शेवटचे आचके देत असल्याचे पाहत पत्नीचा अंगाचा थरकाप उडाला. काही कळायच्या आत तिने पतीचे पाय वर उचलून धरले. घाबरलेल्या त्या अवस्थेत तिच्या तोंडून शब्दही निघत नव्हता. जड देह तिच्याने सांभाळतही नव्हता. तरीही तिने संपूर्ण ताकद पणाला लावली. १० ते १५ मिनिटे त्याच अवस्थेत होती. जेव्हा शेजारच्या महिलेने हे दृश्य पाहिले तेव्हा तिला मदत मिळाली. कोमात गेलेल्या पतीला मेडिकलमध्ये भरती केले. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे तिसऱ्या दिवशी पतीला शुद्ध आली. पत्नीचे धैर्य आणि हिंमतीमुळेच पतीला नवे जीवन मिळाले.

आयुष्यात संकटे अनेक आली पण ३८ वर्षीय त्या पत्नीने या सगळ्यात धैर्य आणि लढाऊ वृत्ती खचू दिली नव्हती. परिस्थितीशी ती सामना करीत होती, परंतु ४२ वर्षीय पती खचून गेला होता. यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. २५ ऑक्टोबर रोजी घरातील एका खोलीत पती एकटाच होता. तर दुसऱ्या खोलीत पत्नी होती. पतीने छतावर टांगलेल्या पंख्याला दोरी बांधली. स्टूलवर चढून स्वत:ला गळफास लावून स्टूल पाडून स्वत:ला लटकवून घेतले. स्टूल पडण्याच्या आवाजामुळे पत्नीने सहज पतीच्या खोलीत डोकावून पाहिले. समोरील दृश्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली. काही समजण्याच्या आताच तिने पतीचे पाय धरले. संपूर्ण ताकद लावून वर उचलून धरले. डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या. कोणाला तरी ओरडून बोलवावे वाटत असलेतरी आवाज बाहेर पडत नव्हता. त्या अवस्थेत ती १० ते १५ मिनिटे होती. त्याचवेळी शेजारची एक महिला कामानिमित्त घराच्या आत आली. तिने ते दृश्य पाहताच आरडाओरड केला. धावून आलेल्या शेजाऱ्यांच्या मदतीने पतीला खाली उतरवले.

-खासगी हॉस्पिटलने नाकारले

कोमात गेलेल्या पतीला पत्नीने जवळच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेले, परंतु तेथील डॉक्टरांनी आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सांगत उपचार करण्यास नाकारले; मात्र तिने हिंमत हरली नाही. तातडीने मेडिकलमध्ये आणले. त्यावेळी कर्तव्यावर असलेले मेडिसीन विभागाचे डॉ. अतुल राजकोंडावार यांनी रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन तातडीने उपचाराला सुरुवात केली. ‘आयसीयू’मध्ये हलवित व्हेंटिलेटरवर ठेवले. सलग तीन दिवसांच्या उपचारानंतर पतीला शुद्ध आली. तेव्हा पत्नी शेजारीच बसली होती. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. पतीच्या गळ्यात पडून ती रडायला लागली. ‘मी आहे ना’ म्हणत हिंमत देत राहिली.

रुग्णाची प्रकृती धोक्याबाहेर

गळफास लावल्याच्या काही मिनिटांतच पत्नीने पतीचे पाय उचलून धरल्याने मानेवर आवळलेला फास काही प्रमाणात शिथिल झाला. एका खासगी हॉस्पिटलने या प्रकरणाला नाकारले तरीही पत्नीने वेळ न गमावता मेडिकलमध्ये आणले. यामुळे उपचार मिळण्यास विलंब झाला नाही. पत्नीची हिंमत आणि तातडीच्या उपचारामुळे तिच्या पतीला नवे जीवन मिळाले. सध्या रुग्णाची प्रकृती धोक्याबाहेर असून पुढील आठवड्यातून सुटी देण्यात येईल.

-डॉ. अतुल राजकोंडावार, औषधवैद्यकशास्त्र विभाग, मेडिकल

Web Title: She held the life of her suicidal husband, not her legs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.