अहो, 'वडील माझे लग्नच करून देत नाहीत'.. म्हणून घर सोडून 'तिने' गाठले रेल्वेस्थानक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2021 12:10 PM2021-08-16T12:10:31+5:302021-08-16T12:11:16+5:30
Nagpur News अहो माझे वडील माझे लग्नच करून देत नाहीत. पहा मी दिसायला किती चांगली आहे. माझ्याशी कोणीही लग्न करायला तयार होईल, अशी विनवणी एका २५ वर्षाच्या युवतीने लोहमार्ग पोलिसांना केल्यामुळे काही काळासाठी काय करावे हे पोलिसांनाही कळले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अहो माझे वडील माझे लग्नच करून देत नाहीत. पहा मी दिसायला किती चांगली आहे. माझ्याशी कोणीही लग्न करायला तयार होईल, अशी विनवणी एका २५ वर्षाच्या युवतीने लोहमार्ग पोलिसांना केल्यामुळे काही काळासाठी काय करावे हे पोलिसांनाही कळले नाही. अखेर तिचे वडील अन् भाऊ आल्यानंतर युवतीची समजूत काढून तिला घरी पाठविण्यात आले. (marriage, police)
कामठी परिसरातील परवीन (बदललेले नाव) ही २५ वर्षाची युवती सकाळी ११ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आली. कोणत्यातरी गाडीत बसून निघून जावे असा तिने मनोमन विचार केला होता. परंतु गाडीत बसण्यापूर्वी तिचा विचार बदलला. ती बराच वेळ रेल्वेस्थानकावर फिरत होती. दुपारी ४ वाजताच्या दरम्यान ती प्री-पेड बूथजवळ फिरत होती. तिच्यावर काही ऑटोचालकांचे लक्ष गेले.
प्री पेड ऑटो युनियनचे अध्यक्ष अल्ताफ अन्सारी यांनी या युवतीला लोहमार्ग पोलीस ठाण्यात पाठविले. त्यानंतर काही वेळातच मुलीचे वडील आणि भाऊही लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांच्यासमोर या युवतीने पोलिसांना आपली कहाणी सांगितली. २५ वर्ष वय होऊनसुद्धा वडील लग्न करून देत नसल्याची तक्रार तिने केली. डीबी पथकाचे योगेश घुरडे आणि महिला पोलीस विना भलावी यांनी युवतीची समजूत घातली. वडिलांची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे ते सध्या लग्न करून देऊ शकत नाहीत, असे सांगून तिला वडील आणि भावासोबत परत पाठविले.
..............