‘रक्ताचे नाते’ गमावलेली ‘ती’ लग्नाच्या बेडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:07 AM2021-06-28T04:07:46+5:302021-06-28T04:07:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : कोरोनाच्या महामारीने अनेकांची जीवनगाथाच बदलवून टाकली. कोरोनाच्या लाटेत अनेकांचे आयुष्य अक्षरश: उद्ध्वस्त झाले. ‘आईची ...

‘She’ lost her ‘blood relationship’ in marriage | ‘रक्ताचे नाते’ गमावलेली ‘ती’ लग्नाच्या बेडीत

‘रक्ताचे नाते’ गमावलेली ‘ती’ लग्नाच्या बेडीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : कोरोनाच्या महामारीने अनेकांची जीवनगाथाच बदलवून टाकली. कोरोनाच्या लाटेत अनेकांचे आयुष्य अक्षरश: उद्ध्वस्त झाले. ‘आईची माया आणि पित्याची छत्रछाया’ गमावलेली असंख्य कुटुंबे अजूनही हुंदकेच देत आहेत. कुणाचा भाऊ बेड न मिळाल्याने दगावला तर कुणाच्या बहिणीने कोरोनामुळे अखेरचा श्वास घेतला. काका, मामा, आत्या, मावशी तर कुणाच्या अगदी जीवलग मित्रावरही आघात झाला. अनेकांनी तर रक्ताची नातीसुद्धा गमावली. उमरेड येथील अशाच एका तरुणीच्या आईवडिलांच्या निधनानंतर सांभाळ करणाऱ्या आजीचा कोरोनामुळे जीव गेला. रक्ताच्या नात्यांचे छत्र हरविले. केवळ आजीच तिचा ‘कंठ’ असतानाच दुष्ट कोरोनाने हा आनंदही तिच्यापासून हिरावला. अशातच सामाजिकतेचा वसा जोपासलेल्या या नगरीतील काही कार्यकर्त्यांनी तिचे दु:ख हेरले. ‘घाबरू नकोस, आम्ही आहोत सोबतीला’ असे म्हणत तिला हिंमत दिली. आज रविवारी (दि.२७) ‘ती’ लग्नाच्या बेडीत अडकली.

सामाजिक कार्यकर्त्यांनी पालकत्त्व स्वीकारल्यानंतर आईवडिलांचे छत्र हरविलेल्या पल्लवी मोहन मसराम या तरुणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पल्लवीच्या आईचे (संगीता) माहेर उमरेडचे. लग्नानंतर रामटेक येथील मोहन मसराम यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. मोलमजुरी करणाऱ्या या दाम्पत्याला पल्लवी ही एकुलती एकच! अशातच सुमारे चार ते पाच वर्षापूर्वी लागोपाठ आईवडिलांच्या मृत्यूने पल्लवी कमालीची हादरली.

तिच्या उमरेड येथील आजीने ‘सावली’ देत तिला सावरले. आजी सुभद्रा सलामे (५५) हिच्या छत्रछायेत पल्लवीचे दु:ख काहीसे हलके झाले होते. अशातच कोरोनाच्या चक्रव्यूहात आजी सुभद्रा सापडली. जीवनमृत्यूच्या लढाईत मृत्यू जिंकला. आजी सुभद्रा हरली. एप्रिल २०२० ला सुभद्रा सलामे यांचा मृत्यू झाला. पल्लवीच्या पायाखालची वाळूच सरकली. ही बाब कळताच अनेकांनी पल्लवीला मदतीचा हात दिला.

पल्लवी मसराम नागपूर येथील अक्षय पेंदाम या तरुणासोबत विवाहबद्ध झाली. उमरेडच्या महिला महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिक्षण घेणाऱ्या पल्लवीस प्रभाकर हत्तीमारे यांनी भावाचे नाते जोपासत बळ दिले. मदतीचा हात दिला. तिच्या लग्नकार्यात मंगेश गिरडकर, घनश्याम लव्हे, नागेश भिवनकर, योगेश मस्की, महेश भुयारकर, मुकेश आंबोने आदींनी सहकार्य आणि धावपळ केली.

......

‘ती’ भावूक झाली

रविवारी उमरेडच्या राममंदिरात नियमावलीचे पालन करीत सकाळी १०.३० वाजता पल्लवी आणि अक्षय विवाह बंधनात अडकले. शनिवारी सुषमा पारवे यांनी आईचे कर्तव्य पार पाडत पल्लवीला ‘साडी-चोळी’ आणि भेटवस्तू प्रदान केली. शिवाय, आज रक्ताच्या नात्यांपैकी कुणीही नसताना अनेक जण मदतीला धावून आल्याने पल्लवी काहीशी भावूक झाली होती.

Web Title: ‘She’ lost her ‘blood relationship’ in marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.