त्यांनी गाण्यांमधून मांडले तथागत बुद्धाचे अध्यात्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:49 PM2018-05-19T23:49:22+5:302018-05-19T23:49:34+5:30
अॅनी चोयींग ड्रोलमा या नेपाळमध्ये राहणाऱ्या भिक्षूनी, मात्र गळ्यातील गोड स्वरांनी त्या आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त गायिका. एखाद्या भिक्क्षूने शांतचित्त बसून बुद्धमंत्र म्हणावे असे त्यांचे गायन. याच शांतिमय स्वरांनी तथागत बुुद्धाचे अध्यात्म त्या जगासमोर मांडत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अॅनी चोयींग ड्रोलमा या नेपाळमध्ये राहणाऱ्या भिक्षूनी, मात्र गळ्यातील गोड स्वरांनी त्या आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त गायिका. एखाद्या भिक्क्षूने शांतचित्त बसून बुद्धमंत्र म्हणावे असे त्यांचे गायन. याच शांतिमय स्वरांनी तथागत बुुद्धाचे अध्यात्म त्या जगासमोर मांडत आहेत. मनाला एकाग्र करणाऱ्या त्यांच्या स्वरांचा अनुभव शनिवारी नागपूरकरांनीही घेतला. ‘फूल पाहणाऱ्यांना जग फुलांसारखेच दिसते व काटे पाहणाऱ्यांना काट्यासारखे... हे बुद्धा, सर्वांची आत्मा शुद्ध कर, आम्हाला काट्यामधूनही फुले दिसावी...’ व ‘प्रत्येकाच्या हृदयात दया आणि प्रेम भरू दे, हे बुद्धा, अशा दयावंतांना विजय मिळू दे...’ अशा नेपाळी भाषेतील बुद्धगीतांनी त्यांनी श्रोत्यांच्या हृदयाच्या तारा बुद्धाशी जोडल्या.
अॅनी ड्रोलमा या नेपाळमधील अनाथ मुलांसाठी शाळा चालविणाऱ्या भिक्क्षूनी. बुद्धाचे मंत्र स्वरात गाण्याची त्यांना आवड. स्टीव्ह टिबेट्स या अमेरिकन संगीतकाराने त्यांना एकदा ऐकले आणि थेट अमेरिकेला बोलावले. त्यांच्या गायनाचे अल्बम बनवून घेतले आणि त्या बुद्धविचार गाणाऱ्या गायक झाल्या. गेल्या १५ ते १८ वर्षांत त्यांनी जगभरात असंख्य कार्यक्रमातून त्यांच्या एकाग्रचित्त गायनातून बुद्धाचे आध्यात्मिक ज्ञान लोकांना ऐकवले आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आयोजित आंतरराष्ट्रीय शांती व समता परिषदेंतर्गत दीक्षाभूमीवर त्यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान त्यांनी काही बुद्धाची कथा व त्यांचे तत्त्वज्ञान सांगणारी नेपाळी भाषेतील गाणी, काही हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या बौद्ध परंपरेतील गाणी होती आणि बहुतेक बुद्ध मंत्र होते. लहान मुले व तरुणांना तत्त्वज्ञान सांगणारे प्रवचन नको असते. त्यामुळे बुद्धाचे विचार गीतांच्या रूपात सांगत असल्याचे त्या म्हणाल्या. खरे म्हणजे ते गायन नव्हते तर बुद्धाचे मंत्र स्वरात म्हणणेच होते. त्यांच्या शांत आणि धीरगंभीर स्वरांनी श्रोत्यांनाही ध्यानमग्न करून त्यांच्या हृदयाच्या तारा तथागत बुद्धाशी एकरूप केल्या.
यावेळी आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, आमदार डॉ. मिलिंद माने व बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांच्या हस्ते अॅनी ड्रोलमा यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय बौद्ध प्रतिनिधी, भिक्क्षू संघ व नागपूरकर श्रोता उपस्थित होते.