एक विवाह ऐसा भी! पतीचे लग्न मोडण्यासाठी 'ती' पोहोचली लग्नमंडपात अन्...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 10:13 AM2021-11-21T10:13:36+5:302021-11-21T10:32:31+5:30
त्यांच्यात अद्यापही काडीमोड झालेला नसताना नवरदेवाने दुसरीच मुलगी पसंत केली. लग्नाचा सोपस्कार सुरू झाला आणि पहिली पत्नी भावासोबत लग्न मंडपात पोहोचली. तेथे पती-पत्नीत जोरदार मारहाण झाली.
नागपूर : दोघांनीही सुखाचा संसार सुरू केला. वर्षभर त्यांनी एकमेकांसोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या. परंतु, त्यांच्या सुखी संसाराला कुणाचेतरी गालबोट लागले. वर्षभरातच पत्नी माहेरी निघून गेली. पतीनेही तिला घटस्फोटाची नोटीस पाठविली. त्यांच्यात अद्यापही काडीमोड झालेला नसताना नवरदेवाने दुसरीच मुलगी पसंत केली. लग्नाचा सोपस्कार सुरू झाला आणि पहिली पत्नी भावासोबत लग्न मंडपात पोहोचली. तेथे पती-पत्नीत जोरदार मारहाण झाली. पती नववधुसह पळून गेला आणि पहिल्या पत्नीने खापरखेडा पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.
आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेऊन मे २०१८ मध्ये राणी (बदललेले नाव) आणि आरोपी नवरदेव आशिष अनिल भमोळे यांनी सुखाचा संसार सुरू केला. परंतु वर्षभरात त्यांच्यात खटके उडू लागले. त्यामुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राणी माहेरी निघून गेली. त्यानंतर आशिषने तिला घटस्फोटाची नोटीसही पाठविली.
अद्याप न्यायालयातून त्यांचा घटस्फोट व्हायचा सुद्धा आहे. परंतु आरोपी नवरदेव गुडघ्याला बाशिंग बांधून बसला होता. त्याने घटस्फोट न होताच दुसरी मुलगी पसंत केली. खापरखेडा कोराडी मार्गावर शेतकरी सेलिब्रेशन लॉनमध्ये शनिवारी दुपारी त्याचे दुसरे लग्न सुरू झाले. वऱ्हाडी मंडळी, नातेवाईक जमले. सर्वत्र शहनाईचे सूर निनादत होते. तेवढ्यात अचानक त्याची पहिली पत्नी राणी आपल्या भावासोबत तेथे पोहोचली. तिने लग्नाची व्हिडीओ शुटिंग करणे सुरू केले.
सुरुवातीला कोणालाच काही कळले नाही. हा प्रकार सुरू असताना आरोपी नवरदेव आशिष भमोळे, अनिल अखंड भमोळे, विजय अनिल भमोळे, सुनील लखनदास भमोळे, रोशन सुनील भमोळे सर्व रा. तांडा पेठ यांनी राणीसोबत वाद घातला. तिचा भाऊ रोहित कछाळे याला लाथाबुक्क्यांनी आणि खुर्चीने जबर मारहाण केली. त्याच्या डोक्याला यामुळे गंभीर दुखापत झाली. आशिषने राणीला मारहाण करून लग्न मंडपाच्या बाहेर काढले. पहिल्या पत्नीनेही त्याची तमा न बाळगता त्याला मारहाण केली. हा प्रकार पाहून लग्न मंडपातील इतर वऱ्हाडी राणीला मारण्यासाठी सरसावले. त्यामुळे तिच्या भावाला सोडून सर्वजण राणीला मारण्यासाठी धावले. कसाबसा जीव वाचवून ती बाहेर पळाली. तिचा भाऊही लग्न मंडपातून बाहेर आला.
राणी आणि तिच्या भावाने खापरखेडा पोलीस ठाणे गाठले. तेथे तक्रार दिल्यानंतर पोलसांनी आरोपी नवरोबाविरुद्ध भादंविच्या कलम ४९४, १४३, ३२३ अंतर्गत आरोपी नवरोबा आशिष अनिल भमोळे, अनिल अखंड भमोळे, विजय अनिल भमोळे, सुनील लखनदास भमोळे, रोशन सुनील भमोळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. एकीकडे घटस्फोट न घेता दुसरे लग्न करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करणे सुरू असताना आरोपी नवरदेवाने नवी नवरी आणि इतर आरोपींसोबत पलायन केले होते. पुढील तपास खापरखेडा पोलीस करीत आहेत.