अगरबत्तीच्या व्यवसायातून फुलवला १००० महिलांच्या आयुष्यात सुगंध !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2022 10:33 AM2022-03-08T10:33:18+5:302022-03-08T10:34:50+5:30
तीन वर्षापूर्वी सामान्य गृहिणी या पलीकडे त्यांची ओळख नव्हती. मात्र काहीतरी करायची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
निशांत वानखेडे
नागपूर : जिद्दीने कामाला लागले की एक दिवस ध्येय गाठता येते आणि कर्तृत्वाचा सुगंध सर्वत्र दरवळायला लागताे. नागपूरच्या अगरबत्त्यांचा सुगंध आज राज्याच्याही सीमेबाहेर दरवळताे आहे. त्यासाठी परिश्रम करणाऱ्या महिलांमध्ये सीमा संजय मेश्राम यांचे आहे. जवळपास एक हजार महिलांना राेजगार देणाऱ्या नागपूर अगरबत्ती क्लस्टर असाेसिएशनच्या संचालकांपैकी त्या एक आहेत.
तीन वर्षापूर्वी सामान्य गृहिणी या पलीकडे त्यांची ओळख नव्हती. मात्र काहीतरी करायची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अशात शासनाच्या उद्याेजक विकास कार्यक्रमामध्ये त्या सहभागी झाल्या. उद्याेगाची निवड, व्यवस्थापन, कर्ज कसे मिळवायचे याबाबत १८ दिवसांचे प्रशिक्षण घेतले. अगरबत्ती निर्मितीचे काम सुरू केले. भाऊ संदीप भरणे यांनी केलेली मदत त्यांच्या व्यवसायाला नवी दिशा देऊन गेली. व्यवसायासाठी बँकेचे कर्ज काढले. १०० महिलांचा ग्रुप तयार केला. त्यातील ४२ महिलांनी जिल्हा उद्याेग केंद्राकडून अनुदान प्राप्त केले आणि उमरेड एमआयडीसीमध्ये प्लाॅट घेतला आणि अगरबत्ती निर्मितीचे क्लस्टर स्थापन केले.
महिन्याला ४०० टनांवर अगरबत्ती
तीन वर्षांत त्यांच्या उद्याेगाने भरारी घेतली आहे. आज या क्लस्टरमध्ये हजारावर महिलांना राेजगार मिळाला असून दर महिन्याला ४०० ते ५०० टन अगरबत्ती तयार केली जात आहे. या अगरबत्त्या देशभरातील कंपन्यांना पुरविल्या जातात. पूर्वी कंपन्या अगरबत्तीसाठी व्हिएतनाम किंवा चीनमधून बांबू स्टिक आयात करायच्या.
नागपूरच्या क्लस्टरने या स्टिक तयार करणे सुरू केले आहे. त्यांनी स्वत:ची आर्यन इंडस्ट्रीज ही कंपनीही सुरू केली आहे. या क्लस्टरच्या माध्यमातून स्वत:चा अगरबत्तीचा ब्रॅन्ड तयार करण्यासह परफ्यूम तयार करण्याचीही याेजना असल्याचे त्यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले.