बॉयफ्रेन्डसाठी 'तिने' उडविले मावशीचे साडेपाच लाख!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 09:34 AM2020-07-03T09:34:51+5:302020-07-03T09:35:19+5:30
अभियांत्रिकीला शिकत असलेल्या बबलीला बॉयफ्रेंडसोबत ऐशोआराम करण्याची चटक लागली होती. मावशीचे एटीएम कार्ड तिला मिळाले. उडविलेल्या पैशातून ती बॉयफ्रेंडसोबत महागड्या पार्टी करीत होती.
जगदीश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बॉयफ्रेंडसोबत पार्टी आणि ऐशोआरामाचे जीवन व्यतीत करण्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने मावशीलाच ५.५० लाखांनी फसविल्याची घटना पुढे आली आहे. सायबर गुन्हेगारीचा तपास करताना पोलिसही या घटनेमुळे आश्चर्यचकित झाले आहेत. या घटनेमुळे बदनामी होईल असे वाटल्यामुळे कुटुंबीयांनीही अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.
पीडित ७० वर्षांचा अभियंता आहे. त्यांचा मुलगा डॉक्टर आणि मुलगी अमेरिकेत शिकत आहे. मुलीच्या उच्च शिक्षणासाठी अभियंत्याच्या पत्नीने आपल्या खात्यात काही रक्कम ठेवली होती. या खात्यातून नोव्हेंबर २०१९ ते जून २०१९ दरम्यान ५.५० लाख रुपये काढण्यात आले. मुलीला पैसे पाठविण्याच्या दरम्यान पैसे गायब झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बँंक खात्याची तपासणी केली असता त्यांना पेटीएममधून रक्कम पाठविल्याची माहिती मिळाली. पीडित आणि त्यांची पत्नी पेटीएमचा वापर करीत नव्हते. पेटीएमची माहिती काढल्यानंतर पीडित अभियंत्याच्या साडभावाचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्या सिमकार्डचा वापर साडभावाची अभियांत्रिकीला शिकत असलेली २२ वर्षाची मुलगी बबली (बदललेले नाव) करीत होती. बबलीला विचारणा केली असता तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु नंतर तिने बॉॅयफ्रेंडसोबत ऐशोआरामासाठी रक्कम खर्च केल्याची कबुली दिली.
अभियांत्रिकीला शिकत असलेल्या बबलीला बॉयफ्रेंडसोबत ऐशोआराम करण्याची चटक लागली होती. मावशी (पीडित अभियंत्याची पत्नी)कडे बबली येत होती. दरम्यान, मावशीचे एटीएम कार्ड तिला मिळाले. त्यावर पिन क्रमांकही लिहिलेला होता. बबलीने मोबाईलवर पेटीएम डाऊनलोड केले. ती मावशीच्या खात्यातून पैसे काढत होती. पेटीएमच्या खात्यातील मर्यादा संपल्यानंतर तिने बॉयफ्रेंडच्या खात्यात रक्कम जमा केली. उडविलेल्या पैशातून ती बॉयफ्रेंडसोबत महागड्या पार्टी करीत होती. आपल्यासाठी महागडे मोबाईल, कपडे, दागिने आणि इतर साहित्य तिने खरेदी केले. तिला आपली मावशी खूप श्रीमंत असून तिला सत्यस्थिती माहीत होणार नाही असे वाटले होते. परंतु बबलीबाबत खरी माहिती पुढे आल्यामुळे सर्व कुटुंब चिंतेत आहे. त्यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. पोलिसांनी हा प्रकार पुन्हा न करण्याचे आश्वासन घेऊन बबलीला सोडून दिले आहे.
-तर फसवणुकीची संधी मिळाली नसती
अभियांत्रिकीला असलेल्या बबलीच्या कृत्यामुळे तिचे आईवडीलही त्रस्त झाले आहेत. त्यांनी इतर कुटुंबीयांना तिच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. पीडित अभियंता आणि त्यांच्या पत्नीला बबलीवर तिचे आईवडील गरजेपेक्षा अधिक लक्ष ठेवत आहेत असे वाटले होते. या घटनेमुळे त्यांना आपली चूक समजली आहे. त्यांनी आपले एटीएम कार्ड सुरक्षित ठेवले असते तर तिला फसवणूक करण्याची संधी मिळाली नसती.