कृत्रिम पायामुळे ती जायला लागली शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:08 AM2021-09-19T04:08:07+5:302021-09-19T04:08:07+5:30

सुमेध वाघमारे नागपूर : एका अपघातात पाय गमावलेली रिया आता कृत्रिम पायाच्या मदतीने शाळेत जाते... विजेच्या धक्क्याने काळा ...

She started going to school because of an artificial leg | कृत्रिम पायामुळे ती जायला लागली शाळेत

कृत्रिम पायामुळे ती जायला लागली शाळेत

Next

सुमेध वाघमारे

नागपूर : एका अपघातात पाय गमावलेली रिया आता कृत्रिम पायाच्या मदतीने शाळेत जाते... विजेच्या धक्क्याने काळा पडलेला सचिनचा उजवा हात कापावा लागला तरी कृत्रिम हाताच्या मदतीने तो पुन्हा लिहायला लागला.. असे एक-दोन नव्हे, तर हजारो प्रकरणे आहेत. अपघातात व आजारात हात-पाय गमाविलेल्यांसाठी मेडिकलचे प्रादेशिक कृत्रिम अवयव केंद्र नवी उमेद ठरत आहे. दिव्यांगांच्या पंखांना स्वावलंबनाचे बळ मिळत आहे.

अचानक हात किंवा पाय गमावावा लागल्यामुळे येणाऱ्या नैराश्याची कल्पनाही करता येत नाही. परंतु, मेडिकलचे प्रादेशिक कृत्रिम अवयव केंद्र रिया व सचिन सारख्यांना पुन्हा एकदा जगण्याची संधी देत त्यांच्या आत्मविश्वाच्या पंखांना बळ देत आहे. राज्यात दोनच ठिकाणी प्रादेशिक कृत्रिम अवयव केंद्र (लिम्ब सेंटर) आहे. एक औरंगाबाद मेडिकलमध्ये तर दुसरे नागपूरचा मेडिकलमध्ये. १९६६ मध्ये सुरू झालेल्या या केंद्रातून आतापर्यंत हजारो दिव्यांगांना कृत्रिम हात, पायासोबतच, विविध उपकरणे, हॅण्ड स्प्लिंट उपलब्ध करून दिले आहे. विशेष म्हणजे, एकदा कृत्रिम अवयव दिले की या केंद्राची भूमिका संपत नाही. वाढते वय व शरीरासोबतच कृत्रिम अवयवांमध्ये बदल करण्यासाठी हे केंद्र आयुष्यभर मदत करीत असते. या केंद्राची वार्षिक ओपीडी ११००च्या घरात आहे. दरवर्षाला १०० ते १५० दिव्यांगांना कृत्रिम अवयव उपलब्ध करून दिले जाते. याशिवाय, ५५०वर रुग्णांना कृत्रिम उपकरणे म्हणजे ‘ऑर्थोटिक अपलायंसेस’, तर १२५ वर रुग्णांना ‘हॅण्ड स्प्लिंट’ तयार करून दिले जाते.

-अवयवाचा आकार, स्नायूंचा विचार करूनच तयार केले जाते कृत्रिम अवयव

मेडिकलचा कृत्रिम अवयव केंद्राची जबाबदारी असलेले डॉ. स्नेहल शंभरकर व कृत्रिम अवयव तज्ज्ञ संजय वाकडे यांनी सांगितले, प्रत्येक रुग्णाच्या अवयवाच्या आकारानुसार, तसेच स्नायूंचा विचार करून कृत्रिम अवयव तयार केला जातो. या अवयवाची सवय होण्यासाठी फिजिओथेरपी डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. काही प्रकरणांमध्ये गुडघ्याखाली अवघा एक ते दीड इंचाचा भाग राहिलेला असतो. त्यामुळे तेवढ्या जागेत कृत्रिम पाय योग्य पद्धतीने बसविणे कौशल्याचे असते. तसेच हाताच्या संदर्भातही असते. कृत्रिम अवयव अजूनही कोपर किंवा ढोपर यांचे काम करण्याबाबत तितकेसे प्रगत झालेले नाहीत, असेही ते म्हणाले.

-रिक्त पदे, साहित्याचाही तुटवडा

मेडिकलमध्ये कृत्रिम अवयव तयार करण्यासाठी प्रॉस्थेटिक, आर्थोटिक तंत्रज्ञांपासून शुमेकर व इतर पदे रिक्त आहेत. यामुळे दिव्यांगांवर कृत्रिम अवयवांसाठी प्रतीक्षेची वेळ येते. शिवाय, निधी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने साहित्याचा तुटवडा पडतो. या समस्या सोडविणे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नैसर्गिक हात व पायाच्या जवळ पोहोचणे गरजेचे असल्याचे वास्तव आहे.

- कृत्रिम अवयव केंद्राचा दर्जा वाढविण्यााठी प्रयत्न

मेडिकलमध्ये येणाऱ्या गरीब व सामान्य रुग्णांनाही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कृत्रिम हात व पाय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहे. लवकरच या केंद्राचा दर्जा वाढवून त्याचा फायदा दिव्यांगांना होईल.

-डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता मेडिकल

Web Title: She started going to school because of an artificial leg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.