‘ती’ ११ महिने मृत्यूशी झुंजली अन्...उच्चविद्याविभूषित नवविवाहितेची छळकथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2021 10:27 PM2021-11-08T22:27:26+5:302021-11-08T22:27:55+5:30
Nagpur News सुस्वरूप, उच्चशिक्षित तरुणीचा सासरच्या लोभी मंडळींनी बळी घेतला. करिश्मा साकेत तामगाडगे (वय २७) असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे.
नागपूर : लग्नाच्या काही दिवसातच तिच्या गोडगुलाबी स्वप्नांचा चुराडा झाला. छळकथा सुरू असतानाच चौथ्या माळ्यावरून ती खाली पडली. गंभीर दुखऱ्या जखमा अन् बधिर शरीर घेऊन ती तब्बल ११ महिने मृत्यूशी झुंजली. अखेर रविवारी ७ नोव्हेंबरला तिने मृत्यूपुढे हात टेकले. एक सुस्वरूप, उच्चशिक्षित तरुणीचा सासरच्या लोभी मंडळींनी बळी घेतला. करिश्मा साकेत तामगाडगे (वय २७) असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे.
कॉम्प्युटर इंजिनिअर असलेल्या करिश्माचे न्यू नरसाळा मार्गावर शारदा कॉम्प्लेक्समध्ये राहणारा आरोपी साकेत भीमराव तामगाडगे याच्यासोबत लग्न झाले होते. साकेत सॉफ्टवेअर डेव्हलपर असून तो पुण्याच्या एका आयटी कंपनीत नोकरीला असल्याचे लग्नापूर्वी सांगण्यात आले होते. त्याचे वडील भीमराव तामगाडगे निवृत्त अधिकारी आहेत. सुखवस्तू कुटुंबात आपल्या मुलीचे लग्न होत असल्याच्या विचाराने तिच्या आईने थाटामाटात लग्न लावून दिले. मात्र, लग्नात मनासारखे आंदण मिळाले नाही म्हणून आरोपी साकेत, त्याचे वडील भीमराव, आई ललिता तसेच बहीण प्राची आणि तिचा नवरा राहुल हे सर्व करिश्माचा छळ करू लागले. त्यामुळे करिश्माच्या स्वप्नाचा चुराडा झाला होता.
अशात लग्नाला अवघे तीन महिने झाले असतानाच २३ डिसेंबरला सायंकाळी ४ च्या सुमारास करिश्मा चौथ्या माळ्यावरील सदनिकेच्या बाल्कनीतून खाली पडली. आरोपी सासऱ्याने तिला धक्का देऊन खाली पाडल्याचा यावेळी पोलिसांना दिलेल्या बयाणात आरोप लावला होता. गंभीर जखमी करिश्माचे हुडकेश्वर पोलिसांनी बयाण नोंदवून आरोपी साकेत, त्याचे वडील, आई आणि बहीण तसेच बहीण जावयाविरुद्ध हुंड्यासाठी छळ करून करिश्माला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, ११ महिन्यांपासून असह्य दुखने घेऊन करिश्माने मृत्यूशी झुंज दिली. रविवारी सकाळी तिने मृत्यूसमोर हात पत्करली. एम्सच्या डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
आईचे विश्वच हरवले
लग्नापूर्वी हुंडा नकोच, म्हणत लॉकडाऊनच्या काळात आरोपी तामगाडगे कुटुंबीयांनी घाईघाईत लग्न जुळविले. लग्न झाल्यानंतर मात्र मनासारखे आंदण मिळाले नाही म्हणून त्यांनी करिश्माला अवघ्या चारच महिन्यात मृत्यूच्या जबड्यात लोटले. करिश्माच्या जाण्यामुळे तिच्या माहेरची मंडळी कमालीची व्यथित झाली आहे. तिच्या आईचे तर विश्वच हरवले आहे. हुडकेश्वर पोलीस या प्रकरणात आता काय कारवाई करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
---