पोटदुखीसाठी 'ती' रुग्णालयात गेली आणि डॉक्टरांनी 'असे काही' सांगितले की तिच्या आनंदाला पारावार उरला नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 08:30 PM2021-11-16T20:30:11+5:302021-11-16T20:32:41+5:30
Nagpur News पोटात दुखत असल्याच्या कारणावरून सरिता नागपूरच्या ‘एम्स’मध्ये दाखल झाली. डॉक्टरांनी तपासल्यावर ९ महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगताच तिला विश्वासच बसला नाही.
नागपूर : मूल व्हावे, इतरांसारखा आपलाही संसार बहरावा यासाठी सरिताने (बदललेले नाव) आवश्यक ते सर्व प्रयत्न व उपचार घेतले. मात्र, पाच वर्षांच्या प्रयत्नानंतरही निराशाच हाती लागली. पुढे ‘ओपन हार्ट सर्जरी’ व ‘स्पाईन सर्जरी’ झाल्याने मूल होण्याच्या तिच्या आशाही मावळल्या. मागील महिन्यात पोटात दुखत असल्याच्या कारणावरून सरिता नागपूरच्या ‘एम्स’मध्ये दाखल झाली. डॉक्टरांनी तपासल्यावर ९ महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगताच तिला विश्वासच बसला नाही. लग्नानंतर तब्बल १७ वर्षांनी तिने मागील महिन्यात एका गोंडस मुलीला जन्म दिला. सरिता आजही या सुखद धक्क्यातून सावरलेली नाही.
विशेष म्हणजे, दीर्घकालीन उच्च रक्तदाब व मधुमेहाचा उपचार घेत असताना तिच्या गर्भावर कोणताही प्रभाव पडला नाही. गर्भवती असल्याचे माहीतच नसल्याने सरिताने काळजीही घेतली नाही. या पार्श्वभूमीवर निरोगी मूल जन्माला येणे हे वैद्यकीयदृष्ट्या आश्चर्यकारक असल्याचे ‘एम्स’च्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था’ (एम्स) नागपूरने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, ४७ वर्षीय सरिता ओटीपोटात दुखत असल्याने दाखल झाली. तिला शल्यक्रिया विभागात पाठविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासल्यावर ९ महिन्यांची गर्भवती असावी, असा संशय आला. त्यांनी लागलीच स्त्रीरोग व प्रसूती विभागात पाठविले. तेथील डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंड केल्यावर ९ महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान केले. सुरुवातीला सरिताला यावर विश्वासच बसला नाही. तिने डॉक्टरांना पुन्हा पुन्हा तपासण्यास सांगितले; परंतु जेव्हा बाळाचे ठोके तिला ऐकविण्यात आले, तेव्हा तिला सुखद धक्का बसला. २७ ऑक्टोबर रोजी तिने ३.२ किलो वजनाच्या मुलीला जन्म दिला.
-हृदयविकार व मधुमेहाच्या दीर्घकालीन औषधीनंतरही निरोगी मूल
‘एम्स’चे निओनॅटोलॉजिस्ट डॉ. निशांत बनाईत यांच्यानुसार, गर्भधारणा असताना सरिता मधुमेह व हृदयविकारावरील औषधी घेत होत्या. या औषधी गर्भासाठी हानिकारक ठरणाऱ्या असतात; परंतु सुदैवाने बाळावर याचा प्रभाव पडला नाही. कोणत्याही विकृतीशिवाय बाळ जन्माला आले. हे एक आश्चर्य आहे. याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.
-भूलदेणेही ठरले किचकट
बधिरीकरण विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. अविनाश प्रकाश म्हणाले, सरितावर यापूर्वी हृदय व स्पाईनची शस्त्रक्रिया झाली होती. शिवाय उच्च रक्तदाब, मधुमेह व इतरही आजाराच्या औषधी सुरू होत्या. अशावेळी प्रसूतीदरम्यान मणक्यात भूलीचे इंजेक्शन देणे किचकट होते. यासाठी विशेष तयारी करावी लागली, जिवाला धोकाही होण्याची शक्यता होती; परंतु जोखमीच्या प्रत्येक बाबीचा विचार केल्याने सर्वच सुरळीत झाले.
-हे एक टीम वर्क
‘एम्स’ नागपूर अतिशय आधुनिक पद्धतीने सुरक्षित मातृत्व आणि बालसंगोपन प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. टीम वर्कमुळेच सरिताची यशस्वी प्रसूती झाली. भविष्यात लवकरच ‘एम्स’मध्ये ‘असिस्टेड रिप्रोडक्टीव्ह सेंटर (एआरटी) सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रातील आधुनिक उपचार पद्धतीमुळे वंध्यत्व निवारण शक्य होईल.
-डॉ. विभा दत्ता, मेजर जनरल, संचालक एम्स नागपूर.