प्रेरणादायक...! विकासाकरिता 'गाव न करी ते व्हॉट्सअॅप ग्रुप करी'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 10:34 AM2023-01-16T10:34:48+5:302023-01-16T10:39:00+5:30

शेगाव (बु.) येथील नागरिकांचा आगळावेगळा उपक्रम

Shegaon citizen in chandrapur dist collect 100 rupees every month on WhatsApp group for the development of the village | प्रेरणादायक...! विकासाकरिता 'गाव न करी ते व्हॉट्सअॅप ग्रुप करी'

प्रेरणादायक...! विकासाकरिता 'गाव न करी ते व्हॉट्सअॅप ग्रुप करी'

Next

नागपूर : व्हॉट्सॲपचा किती चांगला उपयोग केला जाऊ शकतो, हे चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव (बु.) येथील नागरिकांनी दाखवून दिले आहे. त्यांचा व्हॉट्स ॲप ग्रुप गावाच्या विकासाकरिता दर महिन्याला शंभर रुपये गोळा करीत आहे. या रकमेतून रोड दुरुस्ती, नाली दुरुस्ती, बसस्थानक दुरुस्ती, साफसफाई इत्यादी कामे केली जात आहेत. त्यांचा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. हे गाव वरोरा ते चिमूर रोडवर वसलेे आहे.

या गावातील मूळ रहिवासी व सध्या नागपूर येथे रेल्वेमध्ये कार्यरत असलेले किशोर पेटकर यांनी २०१९ मध्ये हा व्हॉट्सॲप ग्रुप स्थापन केला असून त्याला ‘विकास’ नाव देण्यात आले आहे. या ग्रुपमध्ये डॉक्टर, प्राध्यापक, वकील इत्यादी व्यवसायातील १०७ सदस्यांचा समावेश आहे. गावातील काही तरुणही या उपक्रमात स्वत:हून सहभागी झाले आहेत.

पेटकर हे एकदा गावात असताना खराब झालेल्या रोडची दुरुस्ती रखडली होती. त्यासाठी केवळ चार-पाच हजार रुपये खर्च येणार होता. परंतु, प्रशासकीय यंत्रणेतून हे काम करण्यासाठी सहा-सात महिने वेळ लागेल, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्याने दिली. त्यामुळे हे काम नागरिकांच्याच योगदानातूनच करण्याचा विचार पेटकर यांच्या मनात आला. त्यानंतर त्यांनी स्वत:च्या व इतरांच्या आर्थिक मदतीतून रोडची दुरुस्ती केली व हा उपक्रम पुढेही सुरू ठेवण्याच्या उद्देशातून या ग्रुपची स्थापना केली. कोरोना काळात या ग्रुपने गंभीर रुग्णांकरिता ऑक्सिजन सिलिंडर खरेदी केले होते. गरजूंना धान्य वितरित केले होते.

ग्रुपला मिळाले ‘आयएसओ’ प्रमाणपत्र

तीन वर्षे केलेली कल्याणकारी कामे पाहता विकास व्हॉट्सॲप ग्रुपला ४ जानेवारी रोजी आयएसओ-९००१:२०१५ प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र मिळालेला हा पहिला व्हॉट्सॲप ग्रुप असल्याचा दावा पेटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. या प्रमाणपत्रामुळे भविष्यात आणखी जोमाने कल्याणकारी कामे करण्याची प्रेरणा मिळाली. प्रत्येक गावांतील नागरिकांनी असा ग्रुप स्थापन केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

Web Title: Shegaon citizen in chandrapur dist collect 100 rupees every month on WhatsApp group for the development of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.