शहराच्या चार भागांत लवकरच निवारा केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:07 AM2021-03-22T04:07:12+5:302021-03-22T04:07:12+5:30
बांधकाम न करता भाड्याच्या जागेत केंद्र सुरू करणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व ...
बांधकाम न करता भाड्याच्या जागेत केंद्र सुरू करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता विभागातर्फे राष्ट्रीय स्तरावर भिक्षेकरी पुनर्वसन मोहीम राबविली जात आहे. यासाठी देशभरातील १० शहरांची निवड करण्यात आली असून यात नागपूरचा समावेश आहे. शहराच्या पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चार भागांत लवकरच निवारा केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
नागपूर शहरात २०१९ व २०२० मध्ये भिक्षेकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ८८४ व १०७० असे एकूण १९५४ भिक्षेकरी व बेघर आढळून आले. भिक्षेकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शहर विकास कृती नियोजन आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यानुसार प्राथमिक स्तरावर ६० व्यक्तींना निवारागृहाच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करण्यात येईल. यात ३० पुरुष व ५ ते ६ कुटुंबांतील ३० सदस्यांना लाभ देण्यात येईल.
दुसऱ्या टप्प्यात १८९४ भिक्षेकऱ्यांना ते वास्तव्य करीत असलेल्या ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करण्याचे प्रस्तावित आहे. तिसऱ्या टप्प्यात १६ हजार चौ. फूट जागेत बांधकाम करून सदर निवारागृहात १५० भिक्षेकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. याबाबतचा आराखडा केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडे पाठविण्यात आला. निवारा केंद्राच्या बांधकामावर खर्च करण्याऐवजी प्रकल्प तातडीने सुरू करण्यासाठी शहराच्या चार भागांत इमारती भाड्याने घेऊन भिक्षेकरीगृह सुरू करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यानुसार ई -निविदेच्या माध्यमातून सामाजिक संस्थांची निवड केली जाणार आहे. निवारा केंद्रात भिक्षेकऱ्यांना अन्न, वस्त्र, निवारा, दैनंदिन गरजेच्या वस्तू, आरोग्य सुविधा, समुपदेशन व कौशल्य विकास, स्वयंरोजगार, मुलांकरिता शाळा, मनोरंजन अशा स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध करण्यात येतील.
...
मनपाला १.५० कोटीचा निधी
निवारा केंद्रासाठी १ कोटी ५० लाखांचा निधी केंद्र सरकारकडून मनपाला प्राप्त झाला आहे. या प्रकल्पासाठी केंद्राकडून निधी मिळणार असून मनपाला यावर खर्च करावयाचा नाही. या प्रकल्पाच्या माध्यमातून शहराला भिक्षेकरीमुक्त करण्याचा मानस आहे.
....
मनपा सभागृहात प्रस्ताव
शहराच्या विविध भागांत चार निवारा केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी मनपा सभागृहागृहाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, १९ मार्चची सभा स्थगित करण्यात आली आहे. पुढील सभागृहात या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची आशा आहे.