शेषराव मोरे आणि अदिती हर्डीकर यांना संस्कार भारतीचा राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 02:46 PM2019-07-30T14:46:41+5:302019-07-30T14:47:05+5:30
संस्कार भारतीच्या वतीने या वर्षापासून दिला दिल्या जाणारा 'स्व. डॉ. कल्पना व्यवहारे स्मृती राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार' जेष्ठ विचारवंत शेषराव मोरे आणि लेखिका अदिती जोगळेकर-हर्डीकर यांना प्रदान केला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: संस्कार भारतीच्या वतीने या वर्षापासून दिला दिल्या जाणारा 'स्व. डॉ. कल्पना व्यवहारे स्मृती राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार' जेष्ठ विचारवंत शेषराव मोरे आणि लेखिका अदिती जोगळेकर-हर्डीकर यांना प्रदान केला जाणार आहे.
राजहंस प्रकाशनाच्या शेषराव मोरे लिखित 'गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी' व विवेकानंद केंद्राच्या मराठी विभागाने प्रकाशित केलेल्या अदिती हर्डीकर लिखित 'कला आणि राष्ट्रविचार' या साहित्यकृतींची निवड यावर्षीच्या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
मानपत्र आणि १५००० रोख असे पुरस्काराचे स्वरूप असून दि. ३ ऑगस्ट २०१९ रोजी विदर्भ संस्कार भारतीच्या वरोरा येथे आयोजित प्रांत अधिवेशनात तो समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल. जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त, प्रसिद्ध सिने अभिनेते सुनील बर्वे, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सौ. कांचन गडकरी, संस्कार भारतीच्या प्रांताध्यक्ष सूरमणी प्रा.कमल भोंडे, महामंत्री आशुतोष अडोणी, सेंसार बोर्ड सदस्य चंद्रकांत घरोटे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
डॉ. कल्पना व्यवहारे उमरेडच्या कला वाणिज्य महाविद्यालयात मराठीच्या प्राध्यापक होत्या. व्यासंगी वैचारिक व ललित लेखक म्हणून त्या परिचित होत्या. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांची कन्या सौ. वैशाली देशपांडे व दीपाली एकताटे यांनी दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार दिल्या जाणार आहे.
यावर्षी दिल्या जाणारा पहिला पुरस्कार वैचारिक लेखनासाठी निश्चित करण्यात आला होता. रवींद्र देशपांडे, प्रकाश एदलाबादकर व डॉ. छाया नाईक यांचा समावेश असलेल्या तज्ज्ञ समितीने पुरस्कारार्थ ग्रंथ निवड केली.
प्रखर बुद्धिनिष्ठ,वैचारिक लेखनाचा प्रवाह समृद्ध करणारे मराठीतील एक सशक्त लेखक, विचारवंत म्हणून शेषराव मोरे यांची ख्याती आहे. स्वा. सावरकरांच्या विचारांचे चिकित्सक अभ्यासक आणि समर्थ भाष्यकार असणाऱ्या शेषराव मोरे यांनी १८५७ चा जिहाद, अप्रिय पण, काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?, काश्मीर एक शापित नंदनवन, प्रेषितानंतरचे पहिले चार आदर्श खलिफा, मुस्लिम मनाचा शोध, विचारकलह, सत्य आणि विपर्यास, सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद, सावरकरांचे समाजकारण आदी महत्वपूर्ण वैचारिक ग्रंथलेखन करून मराठी साहित्यात भरीव योगदान दिले आहे. अनेक पुरस्कार आणि सन्मानाचे धनी असलेल्या शेषराव मोरे यांनी विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासह अनेक व्यासपीठांवरून वैचारिक मंथन घडवले आहे.
गांधीहत्येसंबंधात स्वा. सावरकरांवरील आधारहीन आरोपांचा अतिशय अभ्यासपूर्ण, साधार, संतुलित आणि खणखणीत समाचार 'गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी' या ग्रंथात मोरे यांनी घेतला आहे.
जे. जे. स्कूल आॅफ आर्ट, मुंबई येथून कलापारंगत अदिती हर्डीकर उत्तम निवेदिका, सृजनशील चित्रकार व ललित लेखिका म्हणून परिचित आहेत. रचनात्मक शैक्षणिक उपक्रम राबविणा?्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून त्यांनी कार्य केले आहे. छात्र प्रबोधन, दै सकाळ, विवेक विचार व कला विषयक विविध नियतकालिकांतून त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे.
स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता यांच्या कला विचारांचे समीक्षण करणारा आणि कलाविषयक भारतीय चिंतनाची मौलिकता विषद करणारा त्यांचा कला आणि राष्ट्रविचार हा ग्रंथ पदार्पणातच लक्षवेधी ठरला आहे.