स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सिंचन भवनातच शिदोरी आंदोलन
By आनंद डेकाटे | Published: May 11, 2023 04:08 PM2023-05-11T16:08:15+5:302023-05-11T16:08:36+5:30
Nagpur News धरणाचे पाणी पाझरून झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीची भरपाई देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात गुरूवारी दुपारी अमरावतीच्या शेतकऱ्यांनी नागपुरातील सिंचन भवनातच ठिय्या मांडत शिदाेरी आंदोलन केले.
आनंद डेकाटे
नागपूर : धरणाचे पाणी पाझरून झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानीची भरपाई देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात गुरूवारी दुपारी अमरावतीच्या शेतकऱ्यांनी नागपुरातील सिंचन भवनातच ठिय्या मांडत शिदाेरी आंदोलन केले. नुकसान भरपाई तातडीने न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरावतीचे जिल्हा अध्यक्ष अमित अढाऊ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. याबाबत अधिक माहिती देताना अढाऊ यांनी सांगितले की, अमरावती जिल्ह्यातील सोनगाव शिवनी धरणाला लागून आमच्या शेतकऱ्यांच्या जमीनी आहेत. २०२१-२२ या वर्षात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे हा प्रकल्प ६० ते ७० टक्के इतका भरला होता. त्यामुळे प्रकल्पाचे पाणी पाझरून येथील शेतकऱ्यांच्या शेतात ते पाणी साचले. त्यामुळे सोयाबीन, तूर, कापसी संत्रा झाडे या पिकांचे मोठे नुकसान झाले. लाखो रूपयांचे नुकसान आहे. परंतु शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने दिली. परंतु काहीच झाले नाही. त्यामुळे आज आम्ही विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांची भेट घएऊन निवेदन देत आहोत. आज शांततेच्या मार्गाने आमचे आंदोलन आहे. मात्र मागणीकडे पुन्हा दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.