‘शिक्षकमित्रा’ने दिली शिक्षा, छड्या अन् २०० उठाबशा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:07 AM2021-07-24T04:07:11+5:302021-07-24T04:07:11+5:30
भिवापूर (नांद)/बेला : कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यावर पर्याय म्हणून शहरात ऑनलाईन वर्ग ...
भिवापूर (नांद)/बेला : कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यावर पर्याय म्हणून शहरात ऑनलाईन वर्ग सुरू झाले. ग्रामीण भागात मात्र इंटरनेट नेटवर्क फेल ठरले. त्यामुळे ग्रामपंचायतीने गावातीलच शिक्षित तरुणांची ‘शिक्षकमित्र’ म्हणून निवड करत अध्यापन सुरू केले. मात्र हेच खाजगी ‘शिक्षकमित्र’ (स्वंयसेवक) आता विद्यार्थ्यांच्या जिव्हारी आणि शिक्षण विभागाच्या अंगलट आले आहे. कारण एका ‘शिक्षकमित्र’ तरुणीने चौथ्या वर्गातील विद्यार्थिनीला हातावर छड्या आणि तब्बल २०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. त्यामुळे चिमुकलीची प्रकृती खालावली आहे. याप्रकरणी मुख्याध्यापक, वर्गशिक्षक व शिक्षकमित्र तरुणी अशा तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मुख्याध्यापक पांडुरंग बुचे, वर्गशिक्षक राजेश चौधरी व शिक्षकमित्र आँचल मंगेश कोकाटे (२१), अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तालुक्यातील महालगाव येथे जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा आहे. कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पर्यायी अध्यापनाचा मार्ग स्वीकारत महालगाव ग्रामपंचायतीने इयत्ता १ ते ७ पर्यंतसाठी गावातीलच शिक्षित सात तरुणांची खाजगी ‘शिक्षकमित्र’ म्हणून निवड केली. याबाबत ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने मासिक सभेत स्वतंत्र ठराव घेतला. त्यानुसार हे सेतूवर्ग शिक्षक मित्राच्या घरी कोविड नियमावलीचे पालन करून सुरू करण्यात आले. इयत्ता ४ थ्या वर्गाची जबाबदारी आँचल मंगेश कोकाटे या शिक्षक मित्राकडे होती. ९ जुलै रोजी ही विद्यार्थिनी सदर शिक्षक मित्राच्या घरी भरलेल्या सेतू वर्गात गेली असता, उशीर झाल्याच्या कारणावरून आँचल कोकाटे या खाजगी शिक्षिकेने चिमुकलीच्या हातावर छड्यांचा मार देत, २०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. त्यामुळे चिमुकलीला शारीरिक त्रासासह मानसिक धक्का बसला. झोपणे, उठणे, श्वास घेणेसुद्धा कठीण झाले आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी चिमुकलीला मानसिक धक्का बसल्याचे सांगितले. याबाबत चिमुकलीचे पालक कपिल वामन मून रा. महालगाव यांनी बेला पोलीस स्टेशनसह मुख्य कार्यकारी अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे शाळेतील सहा शिक्षकांसह खाजगी शिक्षक मित्राविरुद्ध गत २० जुलै रोजी तक्रार केली. दरम्यान, बुटीबोरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चौहान, बेला येथील ठाणेदार पंकज वाघाडे यांनी शुक्रवारी महालगाव येथे जाऊन चौकशी केली. त्यानंतर मुख्याध्यापक, शिक्षक व खाजगी शिक्षक अशा तिघांविरुद्ध बेला पोलीस स्टेशनमध्ये कलम ७५ बाल न्याय अधिनियम २०१५, सहकलम ३५२, ३२५, ५०६ (१) १८८, १०९ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
तज्ज्ञाकडे उपचार सुरू
४ थ्या वर्गात शिकणारी ही विद्यार्थिनी अंदाजे ९ ते १० वर्षांची आहे. हातावर छडीचा मार आणि २०० उठाबशा हा प्रकार धक्कादायक आहे. त्यामुळे चिमुकलीला शारीरिक त्रास तर होतच आहे, सोबतच कोवळ्या वयात शिक्षा झाल्यामुळे तिला जबर मानसिक धक्कासुद्धा बसला आहे. त्यामुळे झोपेतून अचानक उठणे, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास यामुळे ती पूर्णत: घाबरली आहे. प्रारंभी तिला सिर्सी येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर हिंगणघाट, सेवाग्राम व आता नागपूर येथील मेंदूरोग तज्ज्ञांकडे उपचार सुरू आहेत.
---
याप्रकरणी विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली आहे. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चौहान व मी स्वत: आज महालगाव येथे जाऊन चौकशी केली. तपासाअंती मुख्याध्यापक, शिक्षक व खाजगी शिक्षक या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. तपास सुरू आहे. यात आणखी कुणी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.
- संजय वाघाडे, ठाणेदार बेला
-----
लॉकडाऊमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन खाजगी ‘शिक्षकमित्रां’ची निवड केली. सदर प्रकाराबाबत कळताच मी गुरुवारला महालगाव शाळेला व मुलीच्या घरी भेट दिली. मात्र ती हिंगणघाट येथे दवाखान्यात असल्यामुळे पालकांशी भेट झाली नाही.
- विजय कोकोडे, प्रभारी गट शिक्षणाधिकारी भिवापूर
230721\1839-img-20210723-wa0133.jpg
महालगाव येथील जिल्हा परिषद शाळा