“CM एकनाथ शिंदेंनी RSS मुख्यालयाला भेट दिली त्यात गैर काय?”; शिंदे गटाच्या नेत्याचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 07:16 PM2023-12-20T19:16:59+5:302023-12-20T19:20:43+5:30
Shinde Group Vs Thackeray Group: नेमके यांच्या पोटात काय दुखतेय, त्यासाठी यांना काढा द्यायला हवा, असा टोला शिंदे गटाच्या नेत्याने लगावला.
Shinde Group Vs Thackeray Group: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालयाला भेट दिली. यावरून ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या टीकेला शिंदे गटातील नेत्यांनी प्रत्युत्तर दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या रेशीमबाग येथे उपस्थित राहिले. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीस्मारकाला भेट दिली आणि पुष्पांजली अर्पण करून त्यांना विनम्रपणे अभिवादन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसंपर्कप्रमुख सुनील देशपांडे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार भरत गोगावले, आमदार संजय रायमूलकर, आमदार ज्ञानराज चौगुले उपस्थित होते. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. या टीकेला भरत गोगावले यांनी उत्तर दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संघ मुख्यालयाला भेट दिली त्यात गैर काय?
मुख्यमंत्री स्मृती मंदिर येथे भेट देण्यासाठी आले तर त्यात गैर काय आहे. मुख्यमंत्र्याच्या संघ भेटीवर जे वक्तव्य करतात त्यांचे पोट दुखत असेल तर त्यांना चांगला काढा द्यावा लागेल. राऊतांना मुख्यमंत्र्यावर बोलल्याशिवाय किंवा टीका केल्याशिवाय झोप लागत नाही. झोपेतही मुख्यमंत्री दिसतात. आदित्य ठाकरे लहान असताना स्वतः बाळासाहेब ठाकरे स्मृती मंदिर परिसरात आले होते. त्यावेळी रज्जुभैय्या सरसंघचालक होते. त्यावेळी स्मृती मंदिर परिसर पाहून गेले आहे. या ठिकाणी चांगला देश हिताच्या अनुषंगाने नमस्कार करण्यासाठी आलो असल्याचे गोगावले म्हणाले. उद्धव ठाकरे पूर्वी रेशीमबागेत यायचे. आता ते इंडिया आघाडीच्या बैठकीला जातात, या शब्दांत भरत गोगावले यांनी पलटवार केला.
दरम्यान, नेमके यांच्या पोटात काय दुखतेय, त्यासाठी यांना काढा द्यायला हवा. जर आपले आजोबा इथे येऊन हा परिसर पाहून गेले असतील हे आदित्य ठाकरेंच्या लक्षात असेल तर ठीक आहे, नाहीतर त्यांना मी आठवण करून देतो. आणि त्यांना वाटले तर त्यांनी येऊन जावे, असे भरत गोगावले यांनी सांगितले.