शिंदे कणखर नेते, त्यांच्यामुळे महायुतीला मजबुती
By योगेश पांडे | Published: November 27, 2024 05:57 PM2024-11-27T17:57:45+5:302024-11-27T17:59:19+5:30
चंद्रशेखर बावनकुळे : कॉंग्रेस नेत्यांची मुजोरी कायमच
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :महायुतीच्या नेत्यांची लढाई मुख्यमंत्रीपदासाठी नव्हती. तर महाविकासआघाडीचे पक्ष केवळ मुख्यमंत्रीपद डोळ्यासमोर ठेवून लढत होते. जनतेने अखेर आमच्यावरच विश्वास टाकला. आता विरोधकांकडून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या वावड्या उठविण्याची सुरुवात झाली. मात्र शिंदे यांनी उघडपणे आपली भूमिका मांडत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. मुळात शिंदे हे कणखर नेतेच असून त्यांच्यामुळे महायुती आणखी मजबूत झाली आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नागपुरात ते बुधवारी पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.
विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शिंदे नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या होत्या. मात्र शिंदे यांनी स्पष्टपणे भूमिका व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हे जो निर्णय घेतील तो त्यांना मान्य असेल हे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी मी त्यांचे आभार मनतो. शिंदे यांनी राज्याच्या विकासासाठी मौलिक कार्य केले आहे. त्यांच्या रुपाने राज्याला कणखर मुख्यमंत्री लाभला होता. त्यांनी प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. महायुतीचा चेहरा म्हणून त्यांनी समर्पितपणे कार्य केले. महायुतीचे नेते म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका ही राज्यासाठी योग्यच आहे. शिंदे हे खरोखरच कधी रडणारे नव्हे तर लढणारेच नेते आहेत. लढवय्या स्वभावातूनच त्यांनी राजकारण केले आहे. महायुती अभेद्य आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे, असे बावनकुळे म्हणाले.
हरल्यावर मविआला ईव्हीएमच दिसते
जेव्हा जेव्हा महाविकासआघाडी हारते तेव्हा ईव्हीएम खराब असते. मात्र ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगली असते. तेव्हा त्यात त्यांना कुठलीही खोट दिसत नाही. लोकसभेत आम्हाला अपेक्षेप्रमाणे जागा न मिळाल्याने आम्ही ईव्हीएमवर खापर न फोडता आत्ममंथन केले व जनतेत जाऊन काम केले. मात्र कॉंग्रेस व मविआचे नेते मुजोरी करत आहेत. हे जनतेला आवडत नाही. नाना पटोले यांनी तर ईव्हीएमवर बोलण्याऐवजी स्वत:च्या गावात जाऊन कारणांचा शोध घ्यावा, असा चिमटा बावनकुळे यांनी काढला.