पावसाचा वाहतूक सेवेला फटका
By admin | Published: July 10, 2016 01:51 AM2016-07-10T01:51:02+5:302016-07-10T01:51:02+5:30
गेल्या तीन दिवसांपासून नागपूरसह विदर्भात होत असलेल्या पावसामुळे सामान्य जनजीवन प्रभावित झाले आहे.
मुख्यमंत्र्यांचे विमान उतरलेच नाही : रेल्वे, बससेवाही विस्कळीत
नागपूर : गेल्या तीन दिवसांपासून नागपूरसह विदर्भात होत असलेल्या पावसामुळे सामान्य जनजीवन प्रभावित झाले आहे. जिल्ह्यातील अनेक सखल भागात पाणी साचले असून रेल्वे, बस वाहतूक सेवादेखील प्रभावित झाली आहे. नागपुरातून जाणाऱ्या तब्बल १८ रेल्वेगाड्या विलंबाने धावत होत्या तर २ विमानेदेखील नियोजित वेळेत विमानतळावर उतरू शकली नाही. पावसामुळे शनिवारी सामान्य जनतेसोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील फटका बसला. खराब वातावरणामुळे त्यांना नागपुरात उतरताच आले नाही व त्यांचे विमान परत मुंबईकडे वळवावे लागले.
विदर्भ, मध्य प्रदेशात पावसाचा जोर वाढला आहे. शनिवारीदेखील सकाळपासूनच पाऊस सुरू होता. शनिवारी एकाच दिवशी नागपूर विभागात ७४.३४ मिमी. पाऊस पडला. पावसामुळे वाहतूक व्यवस्थेला फटका बसला आहे. यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली होती. पावसाचा जोर दिवसभर कायम असल्याने नागरिकांची फार अडचण झाली. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर येत्या काही दिवसात वाहतूक व्यवस्थेला आणखी जास्त फटका बसण्याची शक्यता आहे.