शिरखुर्म्याची शेवई गुप्ताजींची आणि अक्षय्य तृतीयेची पूजाथाळी येते आयशाकडून
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 11:57 AM2023-04-22T11:57:03+5:302023-04-22T11:57:33+5:30
Nagpur: यंदा रमजान ईद व अक्षय्य तृतीया एकाच दिवशी आलेली आहे. या सणांच्या माध्यमातून नागपूरकरांनी सामाजिक एकोपा व जातीय सलोखा जपला आहे.
- संजय लचुरिया/राजेश टिकले
नागपूर : यंदा रमजान ईद व अक्षय्य तृतीया एकाच दिवशी आलेली आहे. या सणांच्या माध्यमातून नागपूरकरांनी सामाजिक एकोपा व जातीय सलोखा जपला आहे. ईदला मुस्लिम बांधवांकडे बनणारी शेवई, फेणी गुप्ताजींच्या दुकानातून जाते; तर अक्षय्य तृतीयेला हिंदू बांधवांकडे सजणारी पूजेची थाळी आयशा पठाण यांच्या दुकानातून सजते, हीच खासियत नागपूरने अनेक वर्षांपासून जपली आहे.
मोमीनपुऱ्यातील भगवाघर चौकात गुप्ताजी शेवई व फेणीचे दुकान ४० वर्षांपासून आहे. त्यांचा स्वत:चा शेवई आणि फेणीचा कारखाना आहे. गुप्ताजींच्या शेवई फेणीचा गोडवा काही औरच आहे. रमजानला शिरखुर्म्यासाठी शेवई फेणीच्या खरेदीला मुस्लिम बांधवांची चांगलीच गर्दी असते. सोमवारी पेठेत चित्रशाला पूजा भंडार नावाने आयशा पठाण पूजासाहित्याची विक्री करतात. हिंदूंच्या सर्व सणांतील पूजेचे साहित्य आयशाच्या दुकानात मिळते. दिवाळी, नवरात्री, अक्षय्य तृतीयेला हिंदूंच्या घरात काय पूजेचे साहित्य लागते, हे तिला मुखपाठ आहे. वडील मोहम्मद यासीन यांनी ३० वर्षांपूर्वी हे
दुकान लावले होते.
हसनच्या दुकानात उत्सवाचा सुगंध
हसन रजा चिश्ती यांचे महाल परिसरात २० वर्षांपासून भारत सुगंध भंडार नावाने दुकान आहे. हसनने रमजानसाठी खास इत्र, अरेबियन ऊद, सुरमा, लुभान आणले आहे, तर अक्षयतृतीयेसाठी लागणारा चंदनटिका, गुलाबजल, केशरी अष्टगंध, सुवासिक अगरबत्ती, फुलवातीही आहेत.