नागपुरात यंदा शिवराज्याभिषेक सोहळा होणार ऑनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 08:33 PM2020-05-12T20:33:05+5:302020-05-12T20:37:53+5:30
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा ४ जून रोजी येत आहे. नागपुरात तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासूनची आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा सोहळा अत्यंत सुनियोजित पद्धतीने ऑनलाईन पार पडणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा ४ जून रोजी येत आहे. नागपुरात तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासूनची आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा सोहळा अत्यंत सुनियोजित पद्धतीने ऑनलाईन पार पडणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या देशाचे आराध्य आहेत. महाराष्ट्रात तारखेनुसार ६ जूनला दरवर्षी रायगडावर तर तिथीनुसार दरवर्षी नागपुरातील गांधीद्वार येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा सोहळा श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. यंदा कोरोनाच्या सावटामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे, अनेक सार्वजनिक सोहळे रद्द करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने परंपरा पाळली जावी आणि फिजिकल डिस्टन्सिंगही पाळली जावी, या हेतूने असे अनेक सोहळे ऑनलाईन पद्धतीने साजरे केले जात आहेत. त्याच धर्तीवर शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळाही पार पडणार आहे. नागपुरात २० मेपासून या सोहळ्याला सुरुवात होत आहे. त्याअनुषंगाने विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. त्यात निबंध लेखन, चित्रकला, शिवदुर्ग निर्माण स्पर्धा यांचा समावेश असणार आहे. तसेच शिवव्याख्यात्यांच्या व्याख्यानाचे आयोजन ऑनलाईनरीत्या करण्यात येणार आहे. ४ जूनला हा सोहळा वैदिक पद्धतीने पार पडेल. यंदा पोलीस, डॉक्टर, स्वच्छतादूत यांच्या हस्ते महाराजांचे पूजन करण्यात येणार आहे.
कायदा आणि परंपरा दोन्ही पाळायच्या - दत्ता शिर्के
कायदा पाळू तरच परंपरा व धार्मिक विधींना महत्त्व प्राप्त होते. आम्ही शिवरायांचे मावळे कायद्याला प्रथम स्थान देतो आणि म्हणूनच यंदा शिवराज्याभिषेक सोहळा गर्दीविना साजरा करण्याचे आवाहन करतो आहोत. त्याअनुसारच यंदा सर्व कार्यक्रमांचे आयोजन ऑनलाईन करण्यात येत असल्याची माहिती शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे संयोजक दत्ता शिर्के यांनी दिली.