सेनेतील बंडाळीवरून नागपुरात शिवसैनिकांची डरकाळी; शिंदेच्या समर्थनार्थ लागलेले एकमेव होर्डिंग फाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 08:21 PM2022-06-29T20:21:24+5:302022-06-29T20:21:56+5:30
Nagpur News मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी बंड केले. या बंडाचे पडसाद नागपुरातही पहायला मिळाले.
नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी बंड केले. या बंडाचे पडसाद नागपुरातही पहायला मिळाले. शिंदे यांच्या समर्थनार्थ नागपुरातील चितारओळी चौकात एकमेव होर्डिंग लागले. मात्र, दुसऱ्याच दिवशी शिवसैनिकांनी हल्लाबोल करीत ते होर्डिंग फाडले. नागपुरात शिवसैनिकांनी उघडपणे समोर येत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आंदोलने केली. शिंदे गटाच्या समर्थनार्थ असे कुणीही उघडपणे समोर आल्याचे पहायला मिळाले नाही.
आ. आशिष जयस्वालांवर रोष
- रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल हे मूळचे शिवसैनिक आहेत. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला होता. ते सातत्याने मंत्र्यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करीत होते. शेवटी जयस्वालही शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील शिवसैनिक त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळाले. जयस्वाल हे शिवसेनेवर मोठे झाले, आता दगा दिला आहे. पुढील निवडणुकीत त्यांचा हिशेब घेऊ, असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.
शिवसैनिक ठाकरेंच्या पाठीशी
- नागपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ संपूर्ण शिवसेना उभी असल्याचे चित्र आहे. महानगरप्रमुख प्रमोद मानमोडे, किशोर कुमेरिया, शहरप्रमुख दीपक कापसे, नितीन तिवारी यांनी धुरा सांभाळत आंदोलनाची मालिका सुरू ठेवली आहे. शिवसेनेतर्फे नागपूर शहरात आजवर चार आंदोलने करण्यात आली असून एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांविरोधात रोष व्यक्त करण्यात आला.
अखेरचा श्वास शिवसैनिक म्हणूनच घेऊ
- १९९४ पासून मी शिवसेनेत आहेत. उपशाखाप्रमुखापासून ते उपजिल्हाप्रमुख पदापर्यंत काम केले. बंडखोरांनी उद्धव ठाकरेंसारख्या चांगल्या माणसाशी गद्दारी केली, हे दुर्दैव आहे. स्वत:वरील ईडीच्या कारवाया टाळण्यासाठी हे शरण गेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी कुटुंबप्रमुखांची जबाबदारी चोखपणे पार पाडली. बंडखोरांना भविष्यात निश्चितच पश्चाताप होईल. आम्ही अखेरचा श्वास शिवसैनिक म्हणूनच घेऊ.
- डिगांबर ठाकरे, ज्येष्ठ शिवसैनिक
बंडखोरांना पश्चाताप होईल
- गेल्या ३३ वर्षांपासून शिवसेनेत काम करीत आहे. कुठलिही अपेक्षा ठेवली नाही. पक्षासाठी लढत राहिलो.गेल्या ३३ वर्षांपासून शिवसेनेत काम करीत आहे. कुठलिही अपेक्षा ठेवली नाही. पक्षासाठी लढत राहिलो. आमदारांनी स्वार्थासाठी बंडखोरी केली आहे. हे पाहून मनाला वेदना होत आहेत. शिवसेना ही चळवळ आहे. त्यामुळे शिवसैनिक खंबीरपणे उभा असेपर्यंत असे कितीही आमदार गेले तरी फरक पडणार नाही. एकदिवस या बंडखोरांना निश्चितच पश्चाताप होईल.
- राजेश कनोजिया, ज्येष्ठ शिवसैनिक