विदर्भातील पडझड थांबविण्यासाठी ठाकरे गटाचा शिवसंवाद दौरा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 10:37 AM2023-02-23T10:37:41+5:302023-02-23T10:39:37+5:30
संजय राऊत यांच्या कोठडीनंतर ठाकरे गटाचा संपर्कच तुटला
नागपूर : शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर आपले कार्यकर्ते शिंदे गटाकडे जाऊ नये यासाठी उद्धव ठाकरे गटाने धावपळ सुरू केली आहे. विशेषत: विदर्भातील पडझड थांबविण्यासाठी २५ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान ‘शिवसंवाद’ दौरा आयोजित करण्यात आला असून खा. अरविंद सावंत यांच्या नेतृत्वातील नेत्यांची चमू दाखल होत नेते व कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेणार आहेत.
या चमूमध्ये खा. अरविंद सावंत, उपनेते अमोल कीर्तीकर, आ. शिवाजी चोथे, युवा सेनेचे पवन जाधव ही नेतेमंडळी नागपूर, भंडारा, गोंदिया व वर्धा या चार जिल्ह्यांचा प्रत्यक्ष दौरा करणार असून विदर्भातील इतर जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा करणार आहेत. खा. संजय राऊत यांच्यावर नागपूरसह विदर्भाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. राऊत यांनी तब्बल चार वेळा नागपूर दौरा करीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण केला होता. मात्र, त्यानंतर राऊत यांना ईडीची कोठडी झाली व त्यांचा नागपूरशी संपर्क तुटला. विशेष म्हणजे, राऊत यांच्याऐवजी दुसऱ्या नेत्यावर नागपूरची जबाबदारीही सोपविण्यात आली नाही. यामुळे येथील शिवसैनिक अस्वस्थ होते. आता आपल्याला कुणीच वाली उरला नाही, या भावनेने काही पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाले होते.
आता पक्षाचे नाव व चिन्ह मिळाल्याने शिंदे गटाचे मनोबल वाढले असून ठाकरे गटाचे कार्यकर्ते काहीसे खचले आहेत. अशात आपले कार्यकर्ते शिंदे गटात सहभागी होऊ नये यासाठी शिवसेनेने हालचाली सुरू केल्या असून त्यासाठी आता विदर्भात शिवसंवाद यात्रा दाखल होत आहे.
विधानसभानिहाय आढावा घेणार
- शिवसंवाद दौऱ्यात खा. अरविंद सावंत हे विधानसभानिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. काही ठिकाणी मेळावे आयोजित केले जातील. शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले असले तरी हाडाचा कार्यकर्ता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. शिवसंवाद दौऱ्यात ठाकरे गटाची ताकद दाखवू, असे जिल्हाध्यक्ष राजू हरणे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.