यंदाचे हिवाळी अधिवेशन गाजणार; भाजपच्या निशाण्यावर शिवसेनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 01:02 PM2019-12-13T13:02:07+5:302019-12-13T13:02:33+5:30
भाजपने या रणनीती अंतर्गत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे. पण भाजपच्या निशाण्यावर मुख्यत: शिवसेनाच राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदाच्या हिवाळी अधिवेशनात वेगळाच नजारा पाहायला मिळेल. पाच वर्षाची सत्ता गमावल्यानंतर भारतीय जनता पार्टी आता ‘विरोधी पक्षाच्या मोड’वर आली आहे. कित्येक वर्ष मित्र असलेली शिवसेना आता त्यांच्यासाठी शत्रू नंबर एक झाली आहे. भाजपने या रणनीती अंतर्गत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे. पण भाजपच्या निशाण्यावर मुख्यत: शिवसेनाच राहणार आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर राज्यातील सत्तेचे समीकरण बदलले आहे. ३० वर्षापर्यंत मित्र राहिलेले पक्ष आता एकमेकांचे शत्रू बनले आहे. तर शत्रू असलेले पक्ष आता मित्र बनले आहेत. या बदललेल्या परिस्थितीत भाजपने संघटन पर्व सुरू करून संघटना अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह कायम ठेवण्यासाठी पक्षाचे नेते महाविकास आघाडी सहा महिन्यात पडेल, असा दावा करीत आहेत. पक्षाचे प्रदेश प्रवक्ता आ. गिरीश व्यास यांनी तर मे-जून ची डेडलाईन सुद्धा जाहीर केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात पार पडलेल्या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांच्या कोअर कमिटींच्या बैठकीत आक्रमक विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहण्याचा संदेश देण्यात आला. विशेषकरून शिवसेनेला निशाण्यावर घेण्याचे निर्देश देण्यात आले.
पक्षाने सक्षम व आक्रमक विरोधी पक्ष बनण्याची तयारी सुरु केली आहे. याअंतर्गत पक्षाचे आमदार हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात आणि सभागृहाबाहेर सरकारच्या निर्णयाविरुद्ध आवाज बुलंद करतील. विकास कामांना रोखण्याच्या आदेशावर पक्ष आक्रमक झाला आहे. भाजपचे हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात मोर्चासुद्धा काढण्यात आला. पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे की, भाजप अनेक वर्षे विरोधी पक्षातच होते. त्यामुळे विरोधी पक्षाच्या भूमिकेत यायला फारसा वेळ लागणार नाही.
शनिवारी आंदोलन
विकास कामांना रोखण्याच्या सरकारच्या आदेशाविरुद्ध भाजपने शनिवारी व्हेरायटी चौकात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. शहर भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर दुपारी ३ वाजता धरणे आंदोलन केले जाईल. शहराध्यक्ष प्रवीण दटके यांचे म्हणणे आहे की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कधीही निधी कमी होऊ दिला नाही. आता विकास कामे थांबवली जात आहेत. बैठकीत माजी आमदार सुधाकर देशमुख, आ. गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, ग्रामीणचे अध्यक्ष डॉ. राजू पोतदार , माजी आमदार डॉ. मिलिंद माने, अशोक मेंढे, सुभाष पारधी, दयाशंकर तिवारी, कल्पना पांडे, जयप्रकाश गुप्ता, महेंद्र राऊत, रमेश भंडारी, बंडू राऊत, भोजराज डुंबे, किर्तीदा अजमेरा आदी उपस्थित होते.