Nagpur Monsoon Session: शिवसेना आणणार भाजपाला अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 07:43 PM2018-07-04T19:43:15+5:302018-07-04T20:49:31+5:30
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी भाजपाला आता काँग्रेस राष्ट्रवादी बरोबरच सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या विरोधाचाही सामना करावा लागण्याचे संकेत आहेत. तसा इशारा शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पत्रकार परिषदेतून दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांसोबतच सेनेशीही सामना करावा लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी भाजपाला आता काँग्रेस राष्ट्रवादी बरोबरच सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या विरोधाचाही सामना करावा लागण्याचे संकेत आहेत. तसा इशारा शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पत्रकार परिषदेतून दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांसोबतच सेनेशीही सामना करावा लागणार आहे.
नाणार प्रकल्पावरून मुख्यमंत्र्यांनी मंगळवारीच पत्रपरिषद घेऊन शिवसेनेला चूप केले होते. मात्र विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाणार प्रकल्पाबरोबरच भाजपाच्या इतरही विकासात्मक प्रकल्पावर ताशेरे ओढत अधिवेशनात शिवसेनेची वाटचाल कशी असेल ते स्पष्ट केले. बळीराजा अस्वस्थ आहे. ७० ते ८० टक्के शेतकऱ्यांना बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली नाही. पीक कर्ज उपलब्ध झाले नाही. पीक कर्जाच्या नावावर शेतकरी महिलांची लैंगिक प्रताडणा होत आहे. यासंदर्भात शिवसेनेचे आमदार दोन्ही सदनातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार आहे. विशेष करून विदर्भातील धान, सोयाबीन, कापूस, तूर, दूध उत्पादन यावर शिवसेना आक्रमक राहणार आहे. त्याचबरोबर नागपूरसह राज्यभरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. अफवांच्या माध्यमातून मोठ्या घटना घडत आहे. गुन्हेगारांना गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात राजाश्रय मिळत आहे, हे मुद्दे शिवसेना प्रकर्षाने मांडणार आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, संभाजीनगरातील दंगल संदर्भात आवाज उचलण्यात येणार आहे. बँकेतून पळ काढलेल्या कर्जबुडव्यासंदर्भात शिवसेना आक्रमक आहे. पत्रपरिषदेला अनिल परब, सुनील प्रभू, रवींद्र पाठक आदी उपस्थित होते.
नाणार नाही होऊ देणार
नाणार प्रकल्पासंदर्भात स्थानिक कोकणवासीयांनी आपली भूमिका सरकारपुढे मांडली आहे. तरी सुद्धा सरकार या प्रकल्पासाठी आग्रही आहे. शिवसेनेची व पक्ष प्रमुखांची भूमिका स्पष्ट आहे. मुख्यमंत्री जरी प्रकल्पाचे समर्थन करीत असले तरी, आमचे जनतेमध्ये संख्याबळ अधिक आहे. कोकणात हा प्रकल्प होऊ देणार नाही, ही शिवसेनेची भूमिका कायम राहणार आहे. सोबतच बुलेट ट्रेनला ही आमचा विरोध आहे. जनतेचा विनाश करून विकास होत असेल तर, शिवसेनेला तो मान्य नाही, असे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
तीन तासांची प्रतीक्षा,मुख्यमंत्र्यांचे तीन मिनिटात उत्तर
शिवसेनेच्या आमदारांना निधी वाटपात दुजाभाव होत असल्याची नाराजी व्यक्त करण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या कक्षात ठाण मांडले. तब्बल तीन तासांनी मुख्यमंत्री फडणवीस हे त्यांच्या भेटीसाठी आले. आपण शिवसेनेच्या आमदारांनाही भरीव निधी दिला आहे. पाहिजे असल्यास कुणाला किती निधी दिला याची माहिती मी स्वत: देईल. दोन दिवसांनी वित्त मंत्र्यांसोबत बैठक घेऊ, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी तीन मिनिटात दिले व बैठक संपली.