"बाळासाहेब ठाकरेंचे नाव कशा कशाला व किती ठिकाणी द्यायचे, याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा"
By मुकेश चव्हाण | Published: January 20, 2021 10:27 AM2021-01-20T10:27:09+5:302021-01-20T10:33:05+5:30
शिवसेनाप्रमुखांच्या नावास विरोध नाही, पण विवाद होईल, अशा ठिकाणी ते देऊ नये, असे मला वाटते, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
नागपूर: नागपुरस्थित गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचे नामकरण आता ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ असे झाले आहे. मंगळवारी मुंबईत ही घोषणा झाली. याबाबतचा नुकताच शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.
नागपूरजवळ गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान साकारण्यात येत आहे. महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या अखत्यारित असलेल्या या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प आराखडा बनविण्यात आला आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सफारी व सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे.
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचे नामकरण केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास आमचा केव्हाही व कधीही विरोध नाही. मात्र शिवसेनाप्रमुखांचे नाव कशा कशाला व किती ठिकाणी द्यायचे, याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
गोंड, आदिवासी समाजाशी निगडित असल्याने या प्राणिसंग्रहालयास गोंडवना नाव देण्याची गोंड समाजाची मागणी होती व ती मान्यही करण्यात आली होती. शिवसेनाप्रमुखांच्या नावास विरोध नाही, पण विवाद होईल, अशा ठिकाणी ते देऊ नये, असे मला वाटते, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. भाजपा प्रदेश कार्यालयात संघटनात्मक बैठका पार पडल्यावर रात्री पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भाष्य केले.
भारतीय सफारीला होणार प्रारंभ
वैविध्यपूर्ण असलेल्या या उद्यानातील भारतीय सफारीचे काम पूर्ण झाले आहे. २६ जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ती जनतेसाठी खुली केली जाणार आहे. या भारतीय सफारीमध्ये व्याघ्र सफारी, बिबट सफारी, अस्वल सफारी, तृणभक्षी प्राणी सफारीचा समावेश असेल. यासाठी प्राण्यांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. उद्घाटनानंतर ४० आसन क्षमतेची तीन विशेष वाहने व ऑनलाईन तिकीट बुकिंग सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
असे आहे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय
- दोन हजार हेक्टर वनक्षेत्रावर उभारणी, महाराष्ट्र वनविकास महामंडळाकडून कामे पूर्ण
- नागपूर शहराच्या मध्यापासून प्रकल्पाचे अंतर फक्त सहा किलोमीटर
- भविष्यात निसर्ग पर्यटन आणि रोजगार संधीला वाव
- वन्यजीव संवर्धन, संशोधन व शिक्षण तसेच वन्यजीव पुनर्वसनाचे कामही प्राणी उद्यानात होणार