...अन् शिवसेना नेते दानवेंनी घेतला ‘दाएं मूड’चा पवित्रा
By नरेश डोंगरे | Published: December 20, 2022 07:15 AM2022-12-20T07:15:03+5:302022-12-20T07:15:36+5:30
कार्यालयानेही अनुभवले निष्ठा अन् फोटो बदल : हे आपले नव्हे, त्यांचे कार्यालय!
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळ परिसरातील आधीच्या जागी असणारे शिवसेना कार्यालय कुणाचे? या प्रश्नावरून वाद झाला अन् अपेक्षेप्रमाणे शिंदे गटाने त्याला आपले करून त्यात सोफे, खुर्च्या, महापुरुषांसोबतच आपल्या नेत्यांचे फोटोही बसवून घेतले. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे कार्यकर्त्यांच्या गराड्यात शिवसेना कार्यालयात (शिंदे गटाच्या) जायला निघाले. मात्र, वेळीच कुजबुज झाली अन् त्यांनी ‘दाएं मूड’चा पवित्रा घेतला.
हिवाळी अधिवेशनादरम्यान दरवेळी शिवसेनेचे कार्यालय भाजप कार्यालयाच्या बाजूला अर्थात विधानसभेच्या पायऱ्यांपुढे असते. मात्र, शिवसेनेच्या शिंदे गटाला हे कार्यालय मिळाले. कार्यालयातून उद्धव ठाकरे यांचा फोटो काढून त्या ठिकाणी आनंद दिघे यांचा फोटो लावण्याची तयारी सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या दोन्ही बाजूला पुष्पमाला घालण्यासाठी खिळे ठोकण्यात आले.
याचवेळी विधिमंडळाच्या सभागृहाच्या दक्षिण द्वाराजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाजूला शिवसेनेच्या ठाकरे गटाला जागा देण्यात आली.
पक्षप्रमुख आले तरी...
पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे सायंकाळी ४.४५ वाजता नागपूर विमानतळावर दाखल झाले. मात्र, विधिमंडळ परिसरातील त्यांच्या पक्षाच्या कार्यालयात सारे कसे अस्ताव्यस्तच होते. नेत्यांच्या नावाच्या पाट्या बसविणे, फोटो लावणे, खुर्च्या, सोफे सेट करणे, साफसफाई करण्याचे काम सायंकाळी ५ पर्यंत सुरूच होते.
महाराजांचा पुतळाही आणला
- ज्या ठिकाणी शिंदे गटाने कार्यालय थाटले, तेथून ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा फोटो आपल्या कार्यालयात आणला. त्याचवेळी तेथून शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळाही आपल्या कार्यालयात आणला. अशा प्रकारे कार्यालयानेही बदलाचा अनुभव घेतला.
- ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नवीन सोफे, खुर्च्या मागवून घेतल्या. आपल्या नेत्यांचे फोटो आणि नावाच्या पाट्याही मागविल्या. इकडे हा पसारा असताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सभागृहातून बाहेर आले आणि सवयीप्रमाणे आधीच्या जागेवर असलेल्या शिवसेना (शिंदे गटाच्या) कार्यालयाकडे निघाले. त्याचवेळी एका कार्यकर्त्याने त्यांना ‘हे आपले नव्हे, त्यांचे कार्यालय आहे,’ असे लक्षात आणून दिले.