शिवसेना नेत्याची एनटीपीसी अधिकाऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 10:30 AM2018-07-31T10:30:29+5:302018-07-31T10:35:14+5:30

Shiv Sena leader hits NTPC officer | शिवसेना नेत्याची एनटीपीसी अधिकाऱ्याला मारहाण

शिवसेना नेत्याची एनटीपीसी अधिकाऱ्याला मारहाण

Next
ठळक मुद्देमौदा एसडीओ कार्यालयातील प्रकार देवेंद्र गोडबोलेसह अन्य एकावर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: एनटीपीसी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. मात्र उत्तराने समाधान न झाल्याने एनटीपीसीच्या अधिकाऱ्याला खासदारांनी सभागृहाबाहेर काढले. तेवढ्यात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेंद्र गोडबोले यांनी त्यांना मारहाण केली. याबाबत मौदा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गोडबोलेसह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे मौदा तालुक्यातील राजकीय वातावरण आता चिघळण्याची शक्यता आहे.
एनटीपीसी प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या आणि मागण्यांवर विचारविमर्श करून तोडगा काढण्यासाठी मौदा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दुपारी आढावा बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीला खा. कृपाल तुमाने, उपविभागीय अधिकारी (महसूल) अविनाश कातडे, एनटीपीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक (मनुष्यबळ) राजकुमार प्रजापती, जनसंपर्क अधिकारी समीरकुमार चिमनलाल, जिल्हा परिषद सदस्य भारती गोडबोले, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

दोन्ही आरोपी पसार
या प्रकरणी राजकुमार प्रजापती यांच्या तक्रारीवरून मौदा पोलिसांनी देवेंद्र गोडबोले व जितेंद्र गोरले यांच्याविरुद्ध भादंवि ३५३, ३३२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यताही तपास अधिकारी सहायक पोलीस अधिकारी चंद्रशेखर मस्के यांनी व्यक्त केली. दोघांचाही शोध सुरू असल्याचे मस्के यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी गोडबोले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद होता. या प्रकारामुळे आता मौदा तालुक्यातील राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता आहे.

कर्मचाऱ्यांनी नोंदविला निषेध
एनटीपीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिवसेना नेत्याने केलेल्या मारहाणीचा कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदविला. आरोपींना त्वरित अटक न केल्यास आंदोलन करू, असा इशारा कर्मचाऱ्यांसह कामगारांनी दिला आहे. या प्रकारामुळे अधिकाऱ्यांनी काम करावे तर कसे, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत एनटीपीसी आॅफिसर्स असोसिएशन व एनटीपीसी वर्कर्स युनियनने जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सोपविले. प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी एनटीपीसी खंबीरपणे उभे असल्याचे एनटीपीसीने कळविले आहे.

Web Title: Shiv Sena leader hits NTPC officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.