"यापुढे शिवसेनेच्या नादाला कोणी लागलं तर त्याने आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून याव्या"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2022 02:18 PM2022-04-23T14:18:01+5:302022-04-23T16:02:01+5:30
महाभारतातल्या शिखंडीलाही लाजवणारं राजकारण सद्या महाराष्ट्रात सुरू असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.
नागपूर : यापुढे कोणी शिवसेनेच्या नादाला लागलं तर त्याने आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून याव्या, असे थेट आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत दिले आहे. स्वतःमध्ये लढायची ताकद नाही म्हणून या अशा शिखंडीना पुढे केले जात आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
संजय राऊत यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी भाजप व सद्यपरिस्थितीवर कडाडून टीका केली. सध्यांच भाजपच नेतृत्व जर शिवसेनेला आव्हान देत असतील तर तो त्यांचा खुळचटपणा आहे. असे कित्येक आव्हान शिवसेनेने पेलले, असे राऊत म्हणाले. महाभारतातल्या शिखंडीलाही लाजवणारं राजकारण सद्या महाराष्ट्रात सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका.वीस फूट खाली गाडले जाल, असा इशारा त्यांनी दिला.
बोगस लोक हिंदुत्वाच्या नावाखाली शिवसेनेवर हल्ला करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले. हनुमान चालिसा पठण कुठेही करता येईल मात्र, त्यासाठी मातोश्रीची निवड करणं व त्यामागे कट-कारस्तान करणं हाच त्यांचा उद्देश्य आहे. ज्यांना हिंदुत्व शब्द घ्यायला लाज वाटत होती. आज तेच, श्रीराम, हनुमान यांच नाव घेऊन राजकारण करत आहे. बोगस जात प्रमाणपत्राचा वापर करून जी व्यक्ती लोकसभेची निवडणूक लढवते, अशा बोगस खासदारांनी आम्हाला नितीमत्ता शिकवू नये, असे राऊत म्हणाले. यासह, पुन्हा अमरावतीतून लोकसभेत जाऊन दाखवा, असे म्हणत राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांना थेट आव्हान दिले.
सत्तेशिवाय तुमचा जीव तडफडतो आमचा नाही. तुम्हा गटांगळ्या खातायत आम्ही नाही. स्वत:ची पुढे येण्याची हिम्मत नाही व दुसऱ्यांना पुढे करून आम्हाला लक्ष्य केले जात आहे. त्याला प्रत्युत्तर मिळेल. या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आपलं कार्यकाळ पूर्ण करेल असेही त्यांनी ठासून सांगितले. हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत व यांच्यामागे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते उभे राहतात असा थेट आरोप राऊत यांनी फडणवीसांवर केला.
मी आभार मानतो या लोकांच कारण त्यांच्यामुळे शिवसेनेची ताकद दिसून येते, शिवसेनेच मनगट किती मजबूत आहे याची प्रचिती आली. आमच्या मनगटात बाळासाहेबांनी माज भरला आहे तो असाच कायम राहील. यापुढे शिवसेनेच्या नादाला कुणी लागलं तर त्यांनी आपल्या स्मशानाच्या गोवऱ्या रचून यावं, असे राऊत म्हणाले. यासह अमरावती शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कधीकाळी आमचे पाच आमदार होते. लवकरच मोठा मेळावा लावत आहोत. यापुढे अमरावतीत शिवसेनेचाच बोलबाला असेल, असेही राऊत यांनी सांगितले.